जकार्ता : भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांनी इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत थाटात सुरुवात केली आहे. बुधवारी झालेल्या पहिल्या फेरीचा अडथळा पार करत सिंधू आणि श्रीकांत यांनी दुसऱ्या फेरीत आगेकूच केली आहे.

जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या व्यग्र वेळापत्रकानंतर एक महिन्याची विश्रांती घेऊन कोर्टवर उतरलेल्या सिंधूने नव्या दमाने खेळ केला. मात्र पहिल्याच फेरीत तिला विजयासाठी संघर्ष करावा लागला. या मोसमातील पहिल्यावहिल्या विजेतेपदासाठी उत्सुक असलेल्या पाचव्या मानांकित सिंधूने महिला एकेरीत जपानच्या अया ओहोरी हिचे आव्हान ११-२१, २१-१५, २१-१५ असे परतवून लावले. सिंधूचा हा ओहोरीवरील सलग सातवा विजय ठरला. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या सिंधूला पुढील फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ड हिच्याशी लढत द्यावी लागेल. मियाने पहिल्या फेरीत हाँगकाँगच्या यिप पुई यिन हिला १९-२१, २१-१५, २१-१७ असे पराभूत केले.

आठव्या मानांकित श्रीकांतने जपानच्या केंटा निशिमोटो याला ३८ मिनिटे रंगलेल्या पहिल्या लढतीत २१-१४, २१-१३ असे सहज पराभूत केले. गेल्या सहा लढतींमधील श्रीकांतचा हा निशिमोटोवरील पाचवा विजय ठरला. जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या श्रीकांतला दुसऱ्या फेरीत ब्रायस लेवेर्डेझ आणि हाँगकाँगच्या एनजी का लाँग अँगस यांच्यातील विजेत्याशी झुंजावे लागेल.

दरम्यान, पुरुष एकेरीत बी. साईप्रणीथ आणि एच. एस. प्रणॉय यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. यावर्षी स्विस खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या साईप्रणीथला हाँगकाँगच्या वाँग विंग की विन्सेंट याने १५-२१, २१-१३, १०-२१ असे हरवले.