वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची निवड आज

नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड बुधवारी केली जाणार आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत सपशेल अपयशी ठरलेला शिखर धवन,  फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांच्यावर प्रामुख्याने या निवड प्रक्रियेत गांभीर्याने चर्चा होणार आहे.

४ ते ८ ऑक्टोबरदरम्यान राजकोट येथे पहिली, तर १२ ते १६ ऑक्टोबरमध्ये हैदराबादला दुसरी कसोटी रंगणार आहे. नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतासाठी ही मालिका म्हणजे एक प्रकारे पुरेपूर सराव करण्याची सुवर्णसंधी आहे.

मुरली विजयने कौंटी स्पर्धेत खोऱ्याने धावा केल्या असल्या तरी लोकेश राहुल आणि धवन यांनाच पहिली पसंती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चेंडू स्विंग होणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांची भंबेरी उडते, हे सर्वानाच ठाऊक आहे. मात्र येथे फिरकीला पोषक खेळपट्टय़ाच असल्याने फलंदाजांना आपला फॉर्म सुधारण्याची संधी आहे. युवा पृथ्वी शा यालासुद्धा संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटींसाठी पृथ्वीची संघात निवड झाली होती, मात्र अंतिम अकरा खेळाडूंत त्याला स्थान मिळाले नाही.

कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन पक्के असून मधल्या फळीत अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांच्यावरच संघ व्यवस्थापन भरवसा दाखवेल. मात्र यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंत व दिनेश कार्तिक यांपैकी कोणाला संधी मिळते, हे पाहणे रंजक ठरेल.

गोलंदाजीत अश्विनवर प्रामुख्याने मदार असली तरी इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीस तो दुखापतीमुळे मुकला होता. त्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीवरून प्रश्नचिन्ह कायम आहे. शिवाय इशांतलाही गुडघ्याच्या दुखापतीने छेडले असल्यामुळे त्याच्याऐवजी भुवनेश्वर कुमारचे संघातील पुनरागमन निश्चित मानले जात आहे. कारकीर्दीतील पहिल्या कसोटीत छाप पाडणाऱ्या अष्टपैलू हनुमा विहारीलाही संभाव्य संघात संधी मिळू शकते.