जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरील ली चाँगवर मात

भारताच्या एच. एस. प्रणॉयने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मलेशियाच्या ली चाँग वेईवर धक्कादायक विजय मिळवत इंडोनेशिया सुपर सीरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पध्रेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

जागतिक क्रमवारीत २५व्या स्थानावर असलेल्या प्रणॉयने आतापर्यंत ली चाँगविरुद्धच्या दोन्ही लढती गमावल्या होत्या. मात्र जकार्ता कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या या सामन्यात प्रणॉयने तीन वेळा ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या ली चाँगला २१-१०, २१-१८ अशा फरकाने ४० मिनिटांत नामोहरम केले. प्रणॉयची पुढील फेरीत चीनच्या ऑलिम्पिक विजेत्या चेन लाँगशी गाठ पडणार आहे. पहिल्या गेममध्ये प्रणॉयने सुरुवातीपासूनच सामन्यावरील पकड घट्ट करताना ६-० अशी आघाडी घेतली. मग ही आघाडी १०-३ अशी वाढवत आरामात गेम जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये प्रणॉयने पुन्हा १०-६ अशी आघाडी घेतली. मात्र लीने कडवा प्रतिकार केला. त्यामुळे आघाडीमधील दरी १३-१२ अशी कमी झाली. प्रणॉयने पुन्हा वेगवान खेळाचे प्रदर्शन करीत १७-१४ अशी आघाडी घेतली. मात्र लीने पुन्हा बरोबरी साधली. त्यानंतर मात्र प्रणॉयने काही अप्रतिम गुण मिळवत ली चाँगचे विक्रमी सातवे इंडोनेशिया स्पध्रेचे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. ‘‘लीचा खेळ अपेक्षेप्रमाणे बहरला नाही. त्यामुळेच मला विजयाची संधी चालून आली. या विजयाचा मला अत्यंत आनंद झाला आहे,’’ असे प्रणॉयने सांगितले.

श्रीकांतकडून जोर्गेनसेन नामोहरम

प्रणॉयचा कित्ता गिरवत किदम्बी श्रीकांतने डेन्मार्कच्या चौथ्या मानांकित जॅन ओ जोर्गेनसेनचा २१-१५, २०-२२, २१-१६ असा पराभव केला. श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत झू वेई वांग (चायनीज तैपेई) आणि जी का लाँग अँग्यूस (हाँगकाँग) यांच्यातील विजेतयाशी सामना करणार आहे.श्रीकांतने या आधी रिओ ऑलिम्पिकमध्ये जोर्गेनसेनचा पराभव केला होता. यावेळीसुद्धा श्रीकांतने ५७ मिनिटांच्या लढतीत त्याचा पराभव केला.‘‘जोर्गेनसेनविरुद्धचा सामना रंगतदान झाला. परंतु अखेरीस विजय मिळाल्याचा आनंद आहे,’’ असे श्रीकांत म्हणाला.