भारतीय ऑलिम्पिक महासंघ (आयओए) व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) यांच्यात लुसाने येथे बुधवारी आयओएवर घातलेली बंदी उठविण्याबाबत सकारात्मक बैठक झाली. भारतीय ऑलिम्पिक महासंघावर घातलेली बंदी उठविण्यासाठी नियोजनबद्ध मार्ग आखण्याला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने तत्त्वतः मान्यता दिलीये.
क्रीडामंत्री जितेंद्रसिंग, क्रीडा सचिव पी. के. देव, ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेता नेमबाज अभिनव बिंद्रा, ऑलिम्पिक याटिंगपटू मालव श्रॉफ यांनी या बैठकीसाठी भारतीय शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व केले. भारतीय ऑलिम्पिक महासंघातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत दोन्हीही संघटनांमध्ये उपयुक्त चर्चा झाली. आयओएवरील बंदी लवकरच उठविण्यात येईल, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यासाठी नियोजनबद्ध मार्ग आखण्यालाही बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आलीये.