ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये भारताच्या एकामागोमाग एक विकेट जात असताना मोठ्या हिमतीने मैदानात टिच्चून फलंदाजी करत प्रतिस्पर्धी गोलंदाजांना अक्षरश: हैराण करून सोडणाऱ्या चेतेश्वर पुजाराने आयपीएलमध्ये स्वारस्य नसल्याचे विधान केले. ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत पुजारा म्हणाला की मी सध्या जास्तीत जास्त वेळ कुटुंबियांसाठी देऊ शकतोय याचा मला खूप आनंद आहे. माझा दिवस सराव शिबिर आणि फिटनेस ट्रेनिंगमध्येच जातो. तर संध्याकाळी कुटुंबिय व मित्रपरिवारासोबत व्यग्र असतो. त्यामुळे आयपीएलचे सामने पाहताच येत नाहीत. संपूर्ण २४ तास तुम्ही क्रिकेटमध्येच गुंतून राहू शकत नाही. सकाळी नेटमध्ये माझ्या फलंदाजीतील सुधारणेवर मेहनत घेतल्यानंतर संध्याकाळी पुन्हा क्रिकेट पाहात बसणं मला शक्य नाही.

पुजाराने भारताकडून कसोटी मालिकेमध्ये शानदार कामगिरीची नोंद केली. कसोटीमध्ये पुजाराने आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले असले तरी आयपीएलमध्ये पुजाराला संघात दाखल करून घेण्यास कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. आयपीएलची गेली दोन पर्व पुजारा खेळू शकलेला नाही.

”मी आयपीएलमध्ये सहभागी नाही, म्हणून मी आयपीएल पाहात नाही असं मुळीच नाही. आयपीएलचे सामने संध्याकाळी असतात आणि या वेळेत मी कुटुंबियांसोबत चांगला वेळ व्यतित करत असतो. त्यामुळे टेलिव्हिजनसमोर बसून सामने पाहणं शक्य होत नाही.”, असे पुजारा म्हणाला.

कसोटी मालिकेतील कामगिरीबाबत विचारले असता पुजाराने संघाच्या विजयात योगदान देऊ शकलो याचा आनंद असल्याचे म्हटले. कसोटी मालिका माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. संघाच्या यशात मला योगदान देता आले. पण तरीही काही वेळा मी नाहक विकेट गमावल्याचेही माझ्या लक्षात आले. त्यावर मी नेटमध्ये मेहनत घेत आहे. फलंदाजीत नक्कीच आणखी सुधारणा होऊ शकतात. माझ्याकडून मोठ्या खेळीच्या अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असतो, असे पुजारा म्हणाला. यंदाच्या कसोटी हंगामातील ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका कठीण होती, असेही पुजाराने सांगितले.