पंजाबच्या संघाने सलामीच्या सामन्यात राजस्थानवर १४ धावांनी विजय मिळवला. १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला केवळ १७० धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबकडून गेलने सर्वाधिक ७९ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानच्या बटलरचे (६९) प्रयत्न तोकडे पडले. १८५ धावांच्या या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर जोस बटलर याने शानदार अर्धशतक केले. पण तो ४३ चेंडूत ६९ धावांवर असताना त्याला विचित्र पद्धतीने बाद करण्यात आले. पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विन याने अर्धशतकवीर जोस बटलरला अजब पद्धतीने धावबाद केले. गोलंदाजीत चेंडू टाकण्याआधी त्याने नॉन-स्ट्राईककडील यष्ट्यांच्या वरील बेल्स उडवल्या. त्यावेळी बटलर धाव घेण्यासाठी क्रीजबाहेर निघाला होता. त्यामुळे पंचानी त्याला बाद ठरवले. यानंतर अश्विनवर प्रचंड टीका करण्यात आली. त्यामुळे ही मंकड रन-आऊट पद्धत पुन्हा चर्चेत आली.

बटलरवर दोन वेळा ‘मंकडिंग’चा शिकार होण्याची वेळ आली असून अश्विनने सात वर्षांपूर्वीदेखील असे कृत्य केले होते. या पूर्वीही क्रिकेटमध्ये ‘मंकडिंग’चे अनेक प्रसंग घडले आहेत. या निमित्ताने जाणून घेऊ या ‘मंकडिंग’ची काही प्रकरणं –

बिल ब्राऊन विरुद्ध विनू मंकड (१९४७) – १९४७मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनीत झालेल्या कसोटी सामन्यात ‘मंकडिंग’ची घटना सर्वप्रथम घडली. मंकड यांनी बिल ब्राऊनला धावचीत करत सर्वानाचा आश्चर्यचकित केले. परंतु स्वत: ऑस्ट्रेलियन कर्णधार सर डॉन ब्रॅडमन यांनी ‘मंकडिंग’ला पाठिंबा दर्शवल्याने ब्राऊनला बाद ठरवण्यात आले.

कर्टनी वॉल्श विरुद्ध सलीम जाफर (१६ ऑक्टोबर, १९८७) – १९८७च्या विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध सामन्यात विंडीजच्या कर्टनी वॉल्शने ११व्या क्रमांकाचा फलंदाज सलीम जाफरला चक्क तीन वेळा ताकीद दिली होती. मात्र वॉल्शने खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवताना जाफरला चौथ्यावेळीदेखील बाद केले नाही. वॉल्शच्याच शेवटच्या षटकात पाकिस्तानने एक गडी राखून विजय मिळवला.

कपिल देव विरुद्ध पीटर कर्स्टन (३ डिसेंबर, १९९२) – पोर्ट एलिझाबेथ येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या कपिल देवने दक्षिण आफ्रिकेच्या पीटर कर्स्टनला एकदा चेतावनी देऊनदेखील त्याने क्रीझ सोडल्याने त्याला धावचीत केले होते. यामुळे नाराज झालेला आफ्रिकेचा कर्णधार केपलर वेसल्सने पुढील षटकात धाव घेताना अशा प्रकारे बॅट भिरकावली, जी थेट कपिलच्या पायाच्या हाडावर आदळळी. मात्र त्यावेळी सामनाधिकारी व थेट प्रक्षेपणाच्या इतक्या सुविधा नसल्याने हा प्रसंग झाकोळला गेला.

रविचंद्रन अश्विन विरुद्ध लाहिरू थिरिमाने (२१ फेब्रुवारी, २०१२) – ब्रिस्बेन येथे कॉमनवेल्थ बँक तिरंगी स्पध्रेतील सामन्यात अश्विनने श्रीलंकेच्या लाहिरू थिरिमानेला चलाखीने धावचीत केले होते. परंतु संघातील अनुभवी खेळाडू सचिन तेंडुलकरने कर्णधार वीरेंद्र सेहवागशी संवाद साधून थिरिमानेविरुद्ध अपील न करता त्याला फलंदाजी करण्यास सांगितले.

सचित्र सेनानायके विरुद्ध जोस बटलर (३ जून, २०१४) – एजबॅस्टन येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा फिरकीपटू सचित्र सेनानायकेने जोस बटलरला ‘मंकडिंग’ केले होते. कर्णधार अँजेलो मॅथ्यूजनेदेखील सेनानायकेला पाठिंबा दर्शवल्याने बटलरला बाद ठरवण्यात आले. इंग्लंडचा कर्णधार अलिस्टर कूकने यावर तीव्र नाराजी प्रकट केली होती.