करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरातील क्रिकेट स्पर्धा बंद करण्यात आलेल्या आहेत. बीसीसीआयनेही आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. यंदाची स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होण्याची भीती आहे. यासाठीच वर्षाअखेरीस आयपीएलचं आयोजन करता येणं शक्य आहे का याची चाचपणी बीसीसीआय करत आहे. काही दिवसांपूर्वी फक्त भारतीय खेळाडूंना सोबत घेऊन प्रेक्षकांविना आयपीएल सामने खेळवण्याचा पर्यायही काही संघांकडून समोर आला होता. मात्र किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे मालक नेस वाडिया यांच्यामते परदेशी खेळाडूंशिवाय आयपीएलचं आयोजन शक्य नाही, स्पर्धेत परदेशी खेळाडूंचं असणं गरजेचं आहे. ते पीटीआयशी बोलत होते.

“आयपीएल ही भारतीय बोर्डाने तयार केलेली एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमध्ये या स्पर्धेला महत्व आहे. त्यामुळे या स्पर्धेचा आंतरराष्ट्रीय दर्जा आणि संघात परदेशी खेळाडू असणं गरजेचं आहे. पण येत्या काही दिवसांत कोणत्या परदेशी खेळाडूंना प्रवासाची परवानगी मिळते हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. बीसीसीायसमोर सध्या अनेक पर्याय आहेत, पण येत्या काही दिवसांत परिस्थिती अधिक खराब झाली तर काय करणार?? या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा.” वाडिया पीटीआयशी बोलत होते.

२९ मार्चपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार होती. मात्र देशातली करोनाची परिस्थिती पाहता बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत ही स्पर्धा पुढे ढकलली. मात्र यादरम्यानच्या काळातही परिस्थितीत सुधारणा न झाल्यामुळे बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत स्पर्धा स्थगित केली आहे. सध्या सर्व भारतीय क्रिकेटपटू घरात राहून अधिकाधिक वेळ आपल्या परिवारासोबत घालवत आहेत. त्यामुळे हे सर्व खेळाडू आता मैदानात कधी परततात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.