‘हॉटस्टार’शी सामन्यांच्या करारासंबंधी एकमत न झाल्याचा फटका; प्रेक्षकसंख्या कमी होण्याची ‘बीसीसीआय’ला भीती

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या हंगामातील सामने मोबाइलवरून पाहण्यासाठी आतुर असलेल्या लाखो ‘जिओ’ वापरकर्त्यांना गुरुवारी धक्का बसला. ‘आयपीएल’च्या थेट प्रक्षेपणाची सूत्रे हाताळणारे ‘हॉटस्टार’ समूह आणि ‘जिओ’ यांच्यात करारासंबंधी एकमत न झाल्याने यंदा ‘जिओ’ टीव्हीवरून ‘आयपीएल’ सामन्यांचे विनाशुल्क थेट प्रक्षेपण करण्यात येणार नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

संयुक्त अरब अमिराती येथे १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान ‘आयपीएल’चे १३ वे पर्व खेळवण्यात येणार असून प्रेक्षकांना सध्या तरी स्टेडियममध्ये प्रवेशबंदी असल्याने अनेक चाहते मोबाइलवरूनच सामन्याचा आनंद लुटण्याला प्राधान्य देण्याची शक्यता होती. त्यातच ‘जिओ’चे भारतात कोटय़वधी वापरकर्ते असून ‘आयपीएल’चे प्रक्षेपण भागीदार असलेल्या ‘हॉटस्टार’ या अ‍ॅपवरून त्यांना आंतरराष्ट्रीय तसेच ‘आयपीएल’चे सामने मोफत पाहता यायचे.

‘‘हॉटस्टार आणि ‘जिओ’ टीव्ही यांचे फार पूर्वीपासून चांगले संबंध होते. परंतु यंदा थेट प्रक्षेपणासंबंधांतील करार मार्गी न लागल्यामुळे ‘जिओ’च्या वापरकर्त्यांना ‘आयपीएल’चे सामने मोफत पाहता येणार नाहीत. त्यांनाही ‘हॉटस्टार’वरून सामने पाहण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे,’’ अशी माहिती ‘हॉटस्टार’ समूहाच्या पदाधिकाऱ्याने एका संकेतस्थळाला दिली.

‘‘सध्या ९-१० दक्षलक्षांच्या आसपास चाहत्यांकडे ‘हॉटस्टार’चे सदस्यत्व (सबस्क्रिप्शन) आहे, परंतु पुढील वर्षभरात ‘हॉटस्टार’ने १७५ दक्षलक्ष सदस्यत्व मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे, त्यामुळे ‘जिओ’ टीव्ही सोबतचा मोफत सामन्यांचा करार आम्हाला मोडावा लागत आहे,’’ असेही त्या पदाधिकाऱ्याने सांगितले. मात्र यामध्ये कधीही बदल करण्यात येऊ शकतात. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या प्रेक्षपणाच्या कराराविषयी लवकरच पुनर्विचार केला जाईल, असेही त्याने नमूद केले.

दरम्यान, यामुळे ‘हॉटस्टार’लाच नुकसान होण्याची शक्यताही बळावली असून त्यांच्या प्रेक्षकसंख्येत कमालीची घट होऊ शकते. त्यातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) शीर्षक प्रायोजक शोधण्यात व्यस्त असताना त्यांना भारतातून मोबाइलद्वारे सामने पाहणाऱ्यांची संख्या कमी होणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

पंजाबचा करुण नायर करोनामुक्त

किंग्स इलेव्हन पंजाबचा प्रतिभावान फलंदाज करुण नायर करोनामुक्त झाला आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस करुणला करोनाची लागण झाली होती. परंतु दोन आठवडे विलगीकरणात राहिल्यानंतर करुणच्या करोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आला आहे. आता तो आगामी ‘आयपीएल’साठी पंजाबच्या संघासह संयुक्त अरब अमिराती येथे रवाना होऊ शकतो. मात्र त्यापूर्वी ‘बीसीसीआय’ने आखलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार अमिरातीला रवाना होण्यापूर्वी सर्व खेळाडूंसह त्यालाही आणखी तीन वेळा करोना चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.

नाडा-नाडो यांची संयुक्तपणे उत्तेजक चाचणी

अमिराती येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या पर्वात क्रिकेटपटूंची उत्तेजक चाचणी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्था (नाडा) आणि यूएईतील राष्ट्रीय उत्तेजकविरोधी समिती (नाडो) यांच्या संयुक्त विद्यमाने या चाचण्या घेण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे कशालाही स्पर्श न करता या चाचण्या घेण्यात येणार असून त्यासंदर्भात अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. तसेच अमिरातीतही प्रमाणित कार्यप्रणालीचे पालन करण्यात येणार आहे, असे ‘नाडो’तर्फे सांगण्यात आले.