पिआर ह्य़ुज हरबर्ट विजयाचा शिल्पकार
इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग स्पर्धा
पिआर ह्य़ुज हरबर्ट अशा लांबलचक नावानिशी खेळणाऱ्या युवा तडफदार खेळाडूच्या थरारक खेळाच्या जोरावर जपान वॉरियर्स संघाने इंटरनॅशनल प्रीमिअर लीग स्पर्धेतील पहिलावहिला विजय नोंदवला. जपान वॉरियर्सने यूएई रॉयल्सला २४-२१ असे पराभूत केले. पुरुष दुहेरी, पुरुष एकेरी आणि मिश्र दुहेरी अशा तिन्ही लढतींमध्ये विजय मिळवणारा २४ वर्षीय हरबर्ट जपानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. पहिल्या दोन लढती गमावल्यामुळे रॉयल्स एकतर्फी विजय मिळवणार असे चित्र होते. मात्र यंदा आयपीएलच्या ताफ्यात नव्याने समाविष्ट झालेल्या वॉरियर्स संघाने हरबर्टला तोलामोलाची साथ देत विजय साकारला.
सलामीच्या लढतीत रॉयल्सच्या अॅना इव्हानोव्हिकने कुरुमी नारा (बदली खेळाडू- ल्युकिक) वर ६-२ असा सहज विजय मिळवला. लिजंड्स एकेरीत अफलातून खेळाचे प्रदर्शन करताना गोरान इव्हानिसेव्हिकने थॉमस एन्क्विस्टला ६-४ असे नमवले. तिसऱ्या लढतीसह रॉयल्स एकतर्फी विजय मिळवणार असे चित्र असताना लिएण्डर पेस आणि पिआर ह्य़ुज हरबर्ट जोडीने तुल्यबळ टॉमस बर्डीच आणि डॅनियल नेस्टर जोडीवर ६-३ असा सहज विजय मिळवला. पुरुष एकेरीच्या लढतीत युवा हरबर्टने जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये असणाऱ्या बर्डिचवर ६-४ असा खळबळजनक विजय मिळवला. खणखणीत सव्र्हिस आणि ताकदवान फोरहँडच्या फटक्यांच्या बळावर हरबर्टने हा विजय साकारला. अंतिम आणि निर्णायक लढतीत हरबर्ट-ल्युकिक बारोनी जोडीने डॅनियल नेस्टर-क्रिस्तिना लाडेनोव्हिक जोडीवर ६-२ असा विजय मिळवत जपानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

भारतीय संघाकडून खेळायला आवडेल -पेस
‘‘भारतात घरच्या मैदानावर, चाहत्यांच्या प्रतिसादात खेळायची संधी मिळाली आणि आमच्या संघाने विजय मिळवल्याने प्रचंड आनंदी आहे. मात्र स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करायला आवडेल,’’ असे लिएण्डर पेसने सांगितले. इंडियन ऐसेस संघाने पहिल्यावहिल्या आयपीटीएलचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्यांना संघात मोठय़ा प्रमाणावर बदल करायचे नव्हते. ‘‘जपान वॉरियर्सतर्फे खेळतानाही माझी कामगिरी चांगली होत असल्याने इंडियन ऐसेस संघव्यस्थापनाकडून विचारणा झाली आहे. पुढच्या वर्षी समीकरण बदलू शकते. भारतीय संघ, हे मैदान आणि भारतीय चाहते या वातावरणात खेळायला मिळाल्यास धमाल येईल. टेनिसमधील दोन्ही लीगचे खेळाला निश्चितच योगदान आहे. रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोव्हाक जोकोव्हिच या दिग्गजांना पाहण्याची संधी मिळणेही दुर्मीळ आहे,’’ असे पेसने सांगितले.
दिल्ली पोलिसांची अरेरावी
टेनिस पर्वणीसाठी इंदिरा गांधी स्टेडियमवर दाखल झालेल्या चाहत्यांना तसेच प्रसारमाध्यम प्रतिनिधींना दिल्ली पोलिसांच्या अरेरावीला सामोरे जावे लागले. तब्बल २२ प्रवेशद्वारे असलेल्या प्रचंड आकाराच्या स्टेडियममधील काही ठिकाणची धातुशोधक यंत्रणा बंद होती. या कारणास्तव पोलिसांनी स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास मनाई केली. संसदेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे राजधानी दिल्लीत जागोजागी सुरक्षेचे कडे उभारण्यात आले आहे. त्याचाच प्रत्यय स्टेडियमवरही आला. पोलिसांशी शांत भाषेत बोलणाऱ्या काही व्यक्तींना पोलिसांनी हटकले आणि तुरुंगात टाकण्याची धमकीही दिली. तिकिटानुसार योग्य प्रवेशद्वारापाशी जमलेल्या प्रेक्षकांना पोलिसांनी अन्य प्रवेशद्वारातून जाण्यास सांगितले. यामुळे बहुतांशी प्रेक्षकांना दोन किलोमीटरचा वळसा घालून आत जावे लागले.
सुन्या, सुन्या मैफलीत.
तिन्ही दिवसांची सर्व तिकिटे विकली गेल्याचा दावा संयोजकांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात १६,००० प्रेक्षक क्षमता असणारे इंदिरा गांधी स्टेडियम पहिल्या लढतीच्या वेळी निम्मेही भरले नव्हते. ५० हजारांपर्यंत दर गेल्याने प्रेक्षकांनी माघार घेतल्याचे जाणवत होते. दिग्गज खेळाडू तिन्ही दिवसांपैकी नक्की कधी खेळणार, याविषयी स्पष्टता नसल्याने तिकीटविक्रीवर परिणाम झाला. यूएई रॉयल्स संघाकडून खेळणारा रॉजर फेडरर गुरुवारी झालेल्या लढतीसाठी अनुपस्थित असल्याने असंख्य चाहत्यांचा हिरमोड झाला.