दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड संघाने धडाकेबाज सुरुवात केली आहे. केप टाऊन येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडने जॉनी बेअरस्टोच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळाच्या जोरावर यजमान दक्षिण आफ्रिकेवर ५ गडी राखून मात केली.

नाणेफेक जिंकत इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली असली तरीही कर्णधार क्विंटन डी-कॉक, अनुभवी फाफ डु प्लेसिस आणि मधल्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला १७९ धावांचा टप्पा गाठून दिला. डु-प्लेसिसने आपल्या अनुभवाला साजेसा खेळ करत ४० चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ५८ धावा केल्या. इंग्लंडकडून सॅम करनने ३ तर जोफ्रा आर्चर-टॉम करन आणि ख्रिस जॉर्डन या त्रिकुटाने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जेसन रॉय आणि जोस बटलर हे स्वस्तात माघारी परतले. मलानही फारशी चमक दाखवू शकला नाही. ३ बाद ३४ अशी परिस्थिती असताना जॉनी बेअरस्टोने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत मैदानात फटकेबाजीला सुरुवात केली. बेन स्टोक्सनेही त्याला उत्तम साथ दिली. आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेत बेअरस्टोने ४८ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ८६ धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दक्षिण आफ्रिकेकडून जॉर्ज लिंडे, एन्गिडी यांनी प्रत्येकी २-२ आणि शम्सीने १ बळी घेतला.