‘प्रो कबड्डी लीग’ दहा दिवसांवर येऊन ठेपली असताना महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या तुळजापूरला झालेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत मात्र नाराजीचे सूर उमटले आहेत. ‘प्रो कबड्डी लीग’च्या संयोजकांकडून असोसिएशनला अंधारात ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रात या स्पध्रेचे बरेचसे सामने होणार असतानाही आम्हाला काय फायदा होणार, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही, असे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्ता पाथ्रीकर यांनी या सभेत सांगितले.
येत्या २६ जुलैपासून आयपीएलवर आधारित ‘प्रो कबड्डी लीग’ला प्रारंभ होणार आहे. या स्पध्रेत मुंबईचा ‘यु-मुंबा’ आणि पुण्याचा ‘पुणेरी पलटण’ असे दोन संघ सहभागी झाले आहेत. या दोन्ही संघांचे सामने मुंबईचे एनएससीआय क्रीडा संकुल आणि पुण्याचे बालेवाडी क्रीडा संकुल येथे होणार आहेत. महाराष्ट्रात होणाऱ्या या सामन्यांतून महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनला काय फायदा होणार, याबाबत मंगळवारी ‘कबड्डी दिना’च्या पाश्र्वभूमीवर तुळजापूरला झालेल्या कार्यकारिणीच्या सभेत चर्चा करण्यात आली.
‘‘प्रो-कबड्डीसाठी आर्थिक उभारणी महाराष्ट्रातून केली जात आहे. तसेच याच राज्यातील मैदानांवर महत्त्वाचे सामने होणार आहेत, महाराष्ट्रात घडलेल्या अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना या स्पध्रेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. परंतु राज्य कबड्डी असोसिएशनला मात्र सोयिस्करपणे डावलण्यात येत आहे. कबड्डी या खेळाचे खासगीकरण होत असून, ते खेळाला पूरक नाही,’’ अशी प्रतिक्रिया पाथ्रीकर यांनी दिली. ‘‘कार्यकारिणी सभेत झालेल्या चर्चेमध्ये सध्या तरी ‘थांबा आणि वाट पाहा’ ही भूमिका घेण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु मी भारतीय हौशी कबड्डी महासंघाला पत्र लिहून याबाबत जाब विचारणार आहे,’’ असे पाथ्रीकर यांनी पुढे सांगितले.
दरम्यान, राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेतील महाराष्ट्राच्या खराब कामगिरीचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या समितीने चौकशी अहवाल असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील यांच्याकडे काही दिवसांपूर्वीच सादर केला आहे. या अहवालाचा अध्यक्ष अभ्यास करतील आणि मग पुढील सभेत यावर चर्चा करण्यात येईल, अशी माहिती पाथ्रीकर यांनी दिली.