जिल्हा कबड्डी दिन पुरस्कार वितरण सोहळ्यात रवींद्र नाईक यांचे मत

कोणत्याची खेळाचा गुणात्मक दर्जा वाढवायचा असेल, तर त्यासाठी दर्जेदार प्रशिक्षक तयार करणे गरजेचे आहे, असे मत जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी व्यक्त केले. सहाव्या जिल्हा कबड्डी दिनानिमित्त मनमाड येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात नाईक यांनी मार्गदर्शन केले.

नाशिक जिल्हा कबड्डी संघटना आणि मनमाड येथील समता क्रीडा मंडळ यांच्यावतीने आयोजित सोहळा जिल्हा कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष राजेंद्र पगारे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी नाईक यांनी क्रीडा क्षेत्रात भारताला आजतागायत अपेक्षित असे यश प्राप्त करता न येण्यामागे तांत्रिकदृष्टय़ा सक्षम दर्जेदार प्रशिक्षक आणि क्रीडा सुविधांचा अभाव हे कारण असल्याचे सांगितले. कबड्डीचा दर्जा उंचावण्यासाठी कबड्डी संघटनेने खेळाडूंसाठी प्रशिक्षक तयार करावेत. त्यासाठी लागणारे साहित्य हे क्रीडा कार्यालयाकडून  संघटनेला दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी राज्य कबड्डी संघटनेचे सहसचिव प्रकाश बोराडे, जिल्हा कबड्डी संघटनेचे मोहन गायकवाड, उपाध्यक्ष प्रा. शिरीष नांदुर्डीकर, नगरसेवक कैलास गवळी, विनय आहेर, समता क्रीडा मंडळाचे अध्यक्ष वाल्मिक बागूल आदी उपस्थित होते. सोहळ्यात ४४ कबड्डीपटूंना  सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रास्ताविकात गायकवाड यांनी जिल्हा संघटना खेळासह खेळाडूंच्या विकासासाठी तयारी दाखवत असतांनाही संघटक, खेळाडू पुढे येण्यास तयार नाहीत, अशी खंत व्यक्त केली. पुरस्कार्थींच्या वतीने माजी राष्ट्रीय खेळाडू नितीन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात राजेंद्र पगारे यांनी या पुरस्काराने जुने खेळाडू, संघटक आणि संस्थांना ऊर्जा मिळून पुन्हा ते कबड्डीशी निगडीत होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन पंच सतीश सूर्यवंशी, डॉ.रवींद्र मोरे यांनी केले. अशोक गरुड, प्रकाश बोराडे, संजय कोठावदे, योगेश पाटील, चेतन सुतार, संतोष आहिरे, विनय गरुड यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

लोकप्रतिनिधींची अनास्था

कार्यक्रमास आ. पंकज भुजबळ, आ. अपूर्व हिरे, जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार जयंत जाधव, संजय पवार  आदी प्रमुख राजकीय नेत्यांनी उपस्थित राहण्याचे मान्य केले होते. त्यांची नावेही निमंत्रण पत्रिकेत होती, परंतु ते उपस्थित न राहिल्याने त्यांची क्रीडा क्षेत्राबाबतची अनास्था अधोरेखीत झाली आणि कार्यकर्त्यांचाही हिरमोड झाला.