भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयच्या सल्लागार समितीचा सदस्य सौरव गांगुलीच्या अलिशान बंगल्यात डेंग्युचा अळ्या सापडल्या आहेत. याप्रकरणी कोलकाता पालिका प्रशासनाने गांगुलीला नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सौरव गांगुलीचा मोठा भाऊ आणि माजी रणजीपटू स्नेहाशीष यांना डेंग्युची लागण झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गांगुलीच्या भावाची प्रकृती स्थिर असली तरी घरात डेंग्युच्या अळ्या आढळून आल्यामुळे गांगुली अडचणीत सापडला आहे.

कोलकाता महानगर पालिकेच्या स्वास्थ विभाग समितीचे सदस्य अतिन घोष यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, १९ नोव्हेंबरला गांगुलीच्या घरामध्ये डेंग्युच्या अळ्या सापडल्या होत्या. यावेळी स्वच्छता राखण्याची सूचना देण्यात आली. मात्र, या सूचनेचे पालन झाले नाही. परिणामी पालिका प्रशासनाने गुरुवारी केलेल्या तपासणीमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात डेंग्युच्या अळ्या दिसून आल्या. त्यामुळे पालिका प्रशासनाने गांगुलीला नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती घोष यांनी दिली.