बार्सिलोनाच्या लिओनल मेस्सीने बुधवारी अ‍ॅटलेटिको माद्रिद विरूद्ध झालेल्या ला लीगा सामन्यादरम्यान कारकिर्दीतील ७०० वा गोल केला. गेले काही महिने करोनामुळे सर्व क्रीडा स्पर्धा बंद होत्या, पण लॉकडाउन उठवल्यानंतर मेस्सीने आपली धडाकेबाज लय कायम राखत नवा मैलाचा दगड गाठला. सामन्याच्या ५० व्या मिनिटाला मेस्सीने पेनल्टीवर गोल करत हा धडाकेबाज पराक्रम केला.

“अ‍ॅटलेटिको माद्रिद विरुद्ध लिओनल मेस्सीने पेनल्टीवर हा गोल केला. त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीतील हा ७०० गोल ठरला. त्याने बार्सिलोनासाठी ६३० तर अर्जेंटिनासाठी ७० गोल केले. याशिवाय, मैत्रिपूर्ण लढतींमधील गोल पकडून त्याने एकूण ७३५ गोलची केले आहेत”,अशी माहिती बार्सिलोनाने निवेदनाद्वारे दिली. मेस्सीने कारकिर्दीतील पहिला गोल १ मे २००५ ला अल्बॅसेट विरूद्ध कॅम्प नोऊ येथील सामन्यात केला होता.

दरम्यान, बार्सिलोना आणि अ‍ॅटलेटिको माद्रिद यांच्यातील बुधवारचा सामना २-२ असा बरोबरीत सुटला. या बरोबरीमुळे बार्सिलोना ला लिगा गुणतक्त्यात रियल माद्रिदला मागे टाकून पहिले स्थान मिळवण्यात अपयशी ठरला. बार्सिलोनाचे आता ७० गुण आहेत, तर अव्वल क्रमांकावरील रियल माद्रिद ७१ गुणांवर आहे. बार्सिलोनाविरूद्धचा सामना बरोबरीत सोडवणारा अ‍ॅटलेटिको माद्रिदचा संघ ५९ गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे.