20 September 2020

News Flash

लालबाग-परळची कबड्डी पेडर रोडवर पोहोचली

‘‘लीग पद्धतीमुळे कबड्डीकडे पाहण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोनच बदलला आहे.

कबड्डीतज्ज्ञ राजू भावसार (डावीकडून), बॉक्सिंग संघटक जय कवळी व टेनिस संघटक सुंदर अय्यर.

लीग प्रारूप खेळांच्या भल्यासाठीच असल्याचा तज्ज्ञांचा सूर

‘‘लीग पद्धतीमुळे कबड्डीकडे पाहण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोनच बदलला आहे. अंतर्गत बंडाळ्या, राजकारण यामध्ये अडकलेल्या कबड्डीला प्रो-कबड्डी लीगने नवे रुपडे दिले आहे. नोकरीपल्याड विचार करण्याची सवय कबड्डीपटूंना लागली. एकुणातच लालबाग परळ परिसराचा गाभा असलेला कबड्डीचा खेळ सामाजिक स्तरांची वेस ओलांडून पेडर रोडपर्यंत पोहोचला आहे. हे संक्रमण कबड्डीच्या भल्याचे आहे,’’ असे मत कबड्डीतज्ज्ञ राजू भावसार यांनी व्यक्त केले. ‘व्यावसायिकतेची बदलती लीग’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.

‘‘नव्या गोष्टीला विरोध होतोच. प्रो-कबड्डीच्या वेळेसही असेच झाले. मात्र मातीवरून मॅटवर आलेल्या कबड्डीत झालेले बदल स्वागतार्ह आहेत. दूरदर्शननेही कबड्डीला आयाम देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो यशस्वी झाला नाही. खेळाला गतिमान करायचे असेल तर चौकटीबाहेरचा विचार करायलाच हवा. केनियाच्या सरकारने कबड्डीला अंगीकारण्याचे धोरण ठरवले आहे. त्यामुळे केनियामध्ये अव्वल दर्जाच्या कबड्डी प्रशिक्षकांची आवश्यकता निर्माण झाली आहे,’’ असे त्यांनी पुढे सांगितले.

लीगच्या रूपातले व्यावसायिक वळण खेळाच्या सुदृढ बांधणीसाठी आवश्यक आहे, असे मत माजी बॉक्सिंगपटू जय कवळी यांनी व्यक्त केले. ‘‘फुटबॉलसारख्या खेळाला विशिष्ट चाहतावर्ग आहे, क्रिकेट लीगला जत्रेचे स्वरूप आहे. कबड्डीला सामाजिक पाठिंबा आहे. लीगला मिळणारा पाठिंबा चाहत्यांच्या बदललेल्या मानसिकतेचे प्रतीक आहे. लोकांना हवे आहे, तेच टीव्हीवर दाखवले जाते. बॉक्सिंग खेळातल्या लाथाळ्यांमुळे खेळाची प्रगती खुंटली आहे, मात्र अन्य खेळांनी लवचिक धोरण स्वीकारल्याने त्यांचा फायदा झाला आहे,’’असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.

‘‘लीग प्रारूपामुळे शारीरिक आणि मानसिक कणखरता बळकट होण्यास मदत झाली आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या बरोबरीने खेळण्याची संधी मिळते. लीग आयोजित करणे खडतर आव्हान आहे. मात्र अशा स्पर्धा युवा प्रतिभेमध्ये केलेली गुंतवणूक आहे,’’ असे स्पष्ट मत टेनिस संघटक सुंदर अय्यर यांनी मांडले.

‘‘संध्याकाळी असंख्य घरांमध्ये आवर्जून क्रीडा वाहिन्या पाहिल्या जातात. विविध स्तरातल्या हॉटेल्समध्ये टीव्हीवर क्रीडा वाहिन्याच सुरू असतात. विविध खेळातल्या लीगमुळे हा सामाजिक बदल झाला आहे. ही निश्चितच सकारात्मक वाटचाल आहे,’’ असे त्यांनी पुढे सांगितले.

लीगला स्थानिक स्वरूप मिळणे अत्यावश्यक आहे. जेणेकरून देशभरातल्या गुणी खेळाडूंना व्यासपीठ मिळेल. लीगला कौटुंबिक वातावरण मिळणे गरजेचे आहे. समाजातल्या विविध लोकांनी कमाईचा काही वाटा गुंतवल्यास लीग आपलीशी वाटेल.

– सुंदर अय्यर, टेनिस संघटक

 

विविध खेळांतल्या लीगमुळे रोजगाराच्या अनेकविध संधी निर्माण झाल्या आहेत. तंदुरुस्त असेल तर ठरावीक वयानंतरही स्पर्धात्मक लढती खेळू शकतो, हा विश्वास लीगमुळे मिळाला आहे.

– राजू भावसार, माजी कबड्डीपटू

 

लीगच्या रूपात झालेला बदल अपरिहार्य आहे. सर्वसामान्य खेळाडूंना पैसा मिळतोय. त्यांचे जिणे बदलले आहे. स्वत:ची आणि कुटुंबाची गुजराण होऊ शकेल, असा विश्वास आणि स्थैर्य लीग खेळाडूंना देत आहेत. ही अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे.

– जय कवळी, बॉक्सिंग संघटक

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 3:53 am

Web Title: loksatta badalta maharashtra 19
Next Stories
1 बॅलेला रोखण्याचे बेल्जियमसमोर आव्हान
2 ‘प्रो कबड्डी’ सोनू नरवालसाठी वरदान
3 म्युगुरुझाचे आव्हान संपुष्टात
Just Now!
X