News Flash

भारताची पारंपरिक शैली ओल्टमन्स यांनी जपली!

आठवडय़ाची मुलाखत : पराट्ट रवींद्रन श्रीजेश भारताचा हॉकी कर्णधार

पराट्ट रवींद्रन श्रीजेश भारताचा हॉकी कर्णधार

आठवडय़ाची मुलाखत : पराट्ट रवींद्रन श्रीजेश भारताचा हॉकी कर्णधार

भारतीय हॉकी क्षेत्रात अनेक चढउतार झाले. प्रशिक्षकांच्या हकालपट्टीमुळे खेळाडूंच्या तयारीवर परिणाम झाला आणि त्यामुळे हॉकी संघाच्या कामगिरीत सातत्याचा अभाव जाणवला. मात्र रोलँट ओल्टमन्स यांनी प्रशिक्षकाची धुरा सांभाळल्यानंतर जणू संघात नवचैतन्य संचारले आणि गेल्या दोन वर्षांत भारताने जागतिक क्रमवारीतही उत्तुंग झेप घेतली. ओल्टमन्स यांनी भारताची पारंपरिक हॉकी शैली जपून खेळाडूंना प्रशिक्षण दिल्यामुळेच हे शक्य झाले, असे प्रांजळ मत भारतीय संघाचा कर्णधार पराट्ट रवींद्रन श्रीजेशने व्यक्त केले. रिओ ऑलिम्पिक स्पध्रेतील भारतीय संघाच्या कामगिरीबाबत श्रीजेशने दिलखुलासपणे आपले मत व्यक्त केले. ऑलिम्पिकमधील कामगिरीवर निराश झालेल्या श्रीजेशने भविष्यात अजून चांगली कामगिरी करण्याचा निर्धार बोलून दाखवला.

  • रिओ ऑलिम्पिक स्पध्रेतील कामगिरीवर तू निराश आहेस, परंतु तमाम भारतीयांमध्ये पुन्हा हॉकीप्रेम जागवण्यात तुम्ही यश मिळवले आहे. हे संघाचे मनोबल उंचावण्यासाठी पुरेसे नाही का?

– आमच्या कामगिरीमुळे असे खरेच घडले असेल, तर त्याहून दुसरा आनंद नाही. ऑलिम्पिकमधील भारतीय संघाची कामगिरी चांगली झाली, परंतु त्याचे विजयात रूपांतर करण्यात अपयश आले. हे चित्र बदलण्यासाठी कामगिरी अधिक सुधारायला हवी. जर्मनी आणि हॉलंडविरुद्ध खेळाडूंनी उल्लेखनीय खेळ केला. मात्र विजय महत्त्वाचा असतो. त्यामुळे चांगले खेळून हरण्यापेक्षा त्याचे विजयात रूपांतर करण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे. रिओतील चुकांवर अभ्यास करून भविष्यात हॉकी प्रेमींमधील विश्वास अधिक वाढवण्याचा प्रयत्न नक्की करू.

  • दुसऱ्या सत्रात भारतीय संघाला अपयश आल्याचे पाहायला मिळाले. तंदुरुस्तीच्या बाबतीत खेळाडू कमकुवत होते का?

– शारीरिक तंदुरुस्तीत भारतीय संघ कुठेच कमी पडलेला नाही. दुसऱ्या हाफमध्ये आम्ही बचावात्मक खेळ केला. प्रशिक्षकांनी आम्हाला आक्रमक खेळ करण्याचा सल्ला दिला होता. अतिबचावात्मक खेळामुळे आमच्यावर प्रचंड दबाव वाढला आणि दबावात चुका झाल्या. प्रतिस्पर्धी संघाने त्याचा फायदा उचलला. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात गोल करण्याची रणनीती आम्ही आखली होती. प्रशिक्षकांनी आखलेल्या रणनीतीची अंमलबजावणी करण्यात आम्ही कुठे तरी अपयशी ठरलो.

  • ऑल्टमन्स यांनी संघाचा कायापालट केला. त्यांच्या प्रशिक्षण शैलीबाबत काय सांगशील?

– आशिया चषक स्पध्रेपासून ऑलिम्पिकसाठी आमची संघबांधणी सुरू झाली होती. ओल्टमन्स गेले दीड वर्ष मुख्य प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावत असले तरी मागील तीन वष्रे ते उच्च कामगिरी प्रमुख होते. त्यामुळे त्यांना संघाच्या प्रत्येक खेळाडूची उत्तम माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत चांगला समन्वय झाला आहे. भारताच्या पारंपरिक हॉकी शैलीला कोणताही धोका न पोहचवता त्यांनी संघबांधणी केली. त्यामुळे त्यांना समजून घेणे आणि रणनीतीवर आखणे आम्हालाही सोपे जाते.

  • प्रतिभावान युवा खेळाडूंनी फळी तयार होत आहे आणि त्याचा हॉकीला फायदा झाल्याचे दिसते. वरिष्ठ संघात जागा मिळवण्यासाठी अनेक युवा खेळाडूंमध्ये निकोप स्पर्धा पाहायला मिळत आहे?

–  संघात अनेक तरुण खेळाडूंनी आपली छाप सोडली आहे, पण तरुण खेळाडूंनी संघबांधणी करणे थोडेसे घातक ठरेल. कारण संघात वरिष्ठ खेळाडू असणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या अनुभवातून या खेळाडूंना शिकता येईल आणि भविष्यात त्याचा त्यांना फायदा होईल. यंदा भारतात कनिष्ठ विश्वचषक स्पध्रेचे आयोजन होते. त्यामुळे अजूनही युवा खेळाडू वरिष्ठ संघाला मिळतील. प्रत्येक खेळाडूला पर्याय उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे आणि त्यासाठी युवा खेळाडूंची फळी तयार होत आहे.

  • गोलरक्षक किंवा कर्णधार, यापैकी कोणती जबाबदारी सोपी आहे?

– अर्थात गोलरक्षक. पण कर्णधारपदाची भूमिकेचा मला वैयक्तिक फार फायदा झाला. हॉकी असा खेळ आहे की, इथे ११ खेळाडूंनी कर्णधाराच्या भूमिकेत असायला हवे. ज्याच्याकडे चेंडू असतो तोच कर्णधार असतो. त्या वेळी त्यालाच निर्णय घ्यायचे असतात. पण मला कर्णधारापेक्षा गोलरक्षकाची भूमिका सोपी वाटते. चॅम्पियन्स चषक स्पर्धा, २०१७ आशिया चषक त्यानंतर २०१८ मध्ये विश्वचषक, राष्ट्रकुल स्पर्धा हे आता आमचे लक्ष्य आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 2:37 am

Web Title: loksatta sport interview with pr sreejesh
Next Stories
1 भारत ‘अ’ संघाने मालिका जिंकली
2 मरे, सेरेनाची यशस्वी वाटचाल
3 जपानचा विजेतेपदाचा चौकार
Just Now!
X