महाराष्ट्राने मुले व मुली या दोन्ही विभागात विजय मिळवीत कुमारांच्या राष्ट्रीय वॉटरपोलो स्पर्धेत आगेकूच राखली. डायव्हिंगमध्ये महाराष्ट्राच्या सिमरन रजनीने १८ वर्षांखालील गटात सोनेरी कामगिरी केली. शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने मुलांच्या गटात मणिपूर संघाचा १२-२ असा धुव्वा उडविला. त्याचे श्रेय कर्णधार सारंग वैद्य याने पाच गोलांना द्यावे लागेल. त्याला भाग्येशकुमारने दोन गोल करीत चांगली साथ दिली.
मुलींमध्ये महाराष्ट्राने मणिपूर संघावर १६-० असा एकतर्फी विजय मिळविला. त्याचे श्रेय मोनिका मोझेस (४ गोल) व पूजा कुंबरे (३ गोल) यांना द्यावे लागेल. डायव्हिंगमध्ये सिमरन रजनीने एक मीटर स्प्रिंगबोर्ड प्रकारात सोनेरी कामगिरी केली. तिने २६४.१५ गुणांची नोंद केली.
१५ वर्षांखालील गटात बंगालच्या श्वेता डे हिने प्लॅटफॉर्म डायव्हिंगमध्ये सोनेरी कामगिरी करताना १८५.७० गुण नोंदविले. महाराष्ट्राच्या  ऐश्वर्या भोसलेला रौप्यपदक मिळाले. तिने १७२.०५ गुण नोंदविले. तिचीच सहकारी सारिका विडपने १६८.३५ गुणांसह कांस्यपदक मिळविले. मुलांच्या १५ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या निहाल गिरम याला प्लॅटफॉर्म डायव्हिंगमध्ये कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.