वय हा केवळ आकडा आहे, असं अनेकदा म्हटलं जातं. हीच उक्ती पुन्हा एकदा खरी ठरवली आहे मन कौर यांनी… वर्ल्ड मास्टर्स या जागतिक स्तरावरील धावण्याच्या स्पर्धेत १०२ वर्षांच्या भारतीय आजीबाई मन कौर यांनी सुवर्णपदक जिंकले आहे. १०० ते १०४ या वयोगटात त्यांनी २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत आपली तंदुरुस्ती सिद्ध करत त्यांनी सुवर्णकमाई केली.

स्पेनमध्ये या स्पर्धा पार पडल्या. या ऍथलेटिक्स स्पर्धांमध्ये विविध क्रीडाप्रकार खेळवण्यात आले. त्यात २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत १०० ते १०४ या वयोगटात भारताच्या १०२ वर्षाच्या आजीबाईंनी सुवर्णपदक पटकावून देशाचे नाव उंचावले. मूळच्या चंदीगढच्या असलेल्या मन कौर यांनी ३ मिनिटे आणि १४.६५ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. मन कौर यांनी वयाच्या ९३ च्या वर्षी धावण्याच्या स्पर्धामंध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. त्यांचा ७८ वर्षीय मुलगा गुरु देव यांनी त्यांना सहकार्य केले. गुरु देव यांनी ज्येष्ठ नागरिकांची ऑलिम्पिक स्पर्धा मानल्या जाणाऱ्या वर्ल्ड मास्टर्स स्पर्धेत सहभाग घेतला होता.

कौर यांच्या या सुवर्णकमाईची सोशल मीडियावर प्रचंड वाहवा होत आहे. धावण्याच्या अनेक स्पर्धा आणि अनेक मैलांचे दगड पार करणाऱ्या अभिनेता मॉडेल मिलिंद सोमण यानेही प्रशंसा केली आहे.

या वयात असे यश मिळवणे हे साऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे, असे त्याने ट्विट केले आहे.