ऋषिकेश बामणे

प्रत्येकालाच आपल्या देशासाठी काही तरी करून दाखवण्याची इच्छा असते. आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा बाऊ न करता धाडसी निर्णय घेऊन ध्येय गाठणे महत्त्वाचे असते. प्रतिष्ठित ‘टाइम’ साप्ताहिकाने माझ्या कामगिरीची दखल घेतल्यामुळे अपूर्णतेवर मात केल्याचे समाधान मिळाले, अशी प्रतिक्रिया भारताची पॅराबॅडमिंटनपटू मानसी जोशीने व्यक्त केली.

‘टाइम’ साप्ताहिकाने ‘नव्या वाटा शोधणारे, चौकटी भेदणारे आणि परिवर्तन घडवणारे’ असे निकष लावून २०२० वर्षांतील ‘नव्या पिढीचे नेतृत्व’ मानल्या जाणाऱ्या फक्त १० जणांची यादी जाहीर केली. जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या या उदयोन्मुख ताऱ्यांमधील ३१ वर्षीय मानसी शुक्रवारी ‘टाइम’च्या मुखपृष्ठावर झळकली. २०१९ मध्ये अपंगांच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या मानसीच्या या यशामुळे तिच्यासह भारताच्याही शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

‘‘मी बालपणापासूनच ‘टाइम’ साप्ताहिकाविषयी ऐकत आली असल्याने त्याविषयी नेहमीच कुतूहल असायचे; परंतु आज स्वत:चेच छायाचित्र या साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर पाहून मला आकाश ठेंगणे झाले. एक बॅडमिंटनपटू म्हणून जेव्हा कारकीर्दीला सुरुवात केली, तेव्हा कधी स्वप्नातही ‘टाइम’च्या मुखपृष्ठावर झळकण्याचा विचार केला नव्हता,’’ असे मानसी म्हणाली.

२०१९ मध्ये मानसीने अपंगांच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याची किमया साधली होती. या कामगिरीनंतर मानसी प्रकाशझोतात आली. ‘‘२०१९ हे वर्ष माझ्यासाठी फार लाभदायक ठरले. जागतिक स्पर्धेतील त्या कामगिरीमुळे माझा अनेक ठिकाणी सन्मान करण्यात आला. त्यामुळे सुवर्णपदक जिंकल्यानंतर राष्ट्रगीत गातानाचा तो क्षण मी कधीच विसरणार नाही,’’ असे मानसीने सांगितले.

टाळेबंदीच्या काळात अनेक खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीवर परिणाम झालेला दिसत असताना मानसीने मात्र पॅरालिम्पिकच्या दृष्टीने तयारी सुरू ठेवली आहे. ‘‘देशात आजही युवा पिढीतील अनेकांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे संधी मिळत नाही; परंतु माझ्या कारकीर्दीद्वारे मी त्यांना कधीही हार न मानण्याचा सल्ला देईन. यापुढील कारकीर्दीतही एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून नावारूपास येऊन युवा पिढीला प्रोत्साहित करण्यासाठी मी अग्रेसर राहीन,’’ असेही मानसीने सांगितले.

आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग

डिसेंबर २०११ मध्ये म्हणजेच वयाच्या २२व्या वर्षी चेंबूर येथील अणुशक्ती नगर येथून विक्रोळीच्या दिशेने प्रवास करताना मानसीचा अपघात झाला. यामध्ये तिला डावा पाय गमवावा लागला. एक वेळ तिला चालायलाही जमत नव्हते. मात्र व्यावसायिक पातळीवर भारत पेट्रोलियमचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मानसीने या अपघातानंतरही हार न मानता बॅडमिंटनचा ध्यास कायम राखला. अखेर २०१५ मध्ये मानसीला प्रथमच भारताकडून खेळण्याची संधी लाभली. गतवर्षी अपंगांच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून, अशी कामगिरी करणारी पहिलीवहिली भारतीय महिला खेळाडू ठरण्याचा मान मिळवला. यामुळे मानसीची दखल सगळीकडे घेतली गेली आणि त्याचेच फळ म्हणून तिच्याकडे आज नव्या पिढीचे नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे.