ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तिसरा पराभव टाळण्यासाठी भारताचे प्रयत्न

कॅनबरा : गोलंदाजांचा स्वैर मारा, ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि दडपणाखाली ढेपाळलेल्या फलंदाजीमुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका ०-२ अशा फरकाने गमावली. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात किमान प्रतिष्ठा राखण्याच्या निर्धाराने भारताचे खेळाडू मैदानात उतरतील.

मर्यादित षटकांच्या प्रकारातील मातब्बर फलंदाज मानल्या जाणाऱ्या रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारताला दोन्ही लढतींमध्ये ३५०हून अधिक धावांचे लक्ष्य गाठण्यात अपयश आले. त्याशिवाय गोलंदाजांची फळी बळी मिळवण्याबरोबरच धावांचा वर्षांव रोखण्यातही अपयशी ठरली.

मनुका ओव्हल येथील खेळपट्टीसुद्धा फलंदाजांसाठी नंदनवन असल्याने तिसऱ्या लढतीत भारतीय संघात अनेक बदल अपेक्षित आहेत. त्याशिवाय कोहलीच्या नेतृत्वावरसुद्धा अनेक जण लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे उपलब्ध गोलंदाजांचा योग्य वापर करण्यात कोहली तिसऱ्या लढतीत तरी यशस्वी होणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हार्दिककडून दुहेरी योगदानाची अपेक्षा

दुसऱ्या सामन्यात हार्दिक पंडय़ाने चार षटके गोलंदाजी करताना स्टीव्ह स्मिथचा बळी मिळवला. परंतु १० षटके गोलंदाजी करण्याइतपत हार्दिक तंदुरुस्त नसल्यामुळे आघाडीच्या पाच गोलंदाजांवर अतिरिक्त भार येत आहे. त्यामुळे हार्दिककडून भारताला पुन्हा एकदा दुहेरी योगदानाची अपेक्षा आहे.

* सामन्याची वेळ : सकाळी ९.१० वा.

* थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३ आणि संबंधित एचडी वाहिन्यांवर

नटराजन, पांडे यांना संघात स्थान?

पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे ८३ आणि ७० धावांची खैरात करणाऱ्या नवदीप सैनीचे संघातील स्थान धोक्यात मानले जात आहे. त्याच्याजागी डावखुरा टी. नटराजन अथवा मुंबईकर शार्दूल ठाकूरला संधी दिली जाऊ शकते. तसेच सलामीवीर म्हणून मयांक अगरवालही (२२ आणि २८) फारशी चमक न दाखवू शकल्यामुळे के. एल. राहुलला सलामीला पाठवून मधल्या फळीत मनीष पांडेला स्थान मिळू शकते.