पाठीच्या दुखण्यामुळे भारताचा दौरा अर्धवट सोडणारा मायकेल क्लार्क आता आयपीएल (इंडियन प्रीमिअर लीग)मध्येही खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पाठीच्या दुखण्यातून पूर्णपणे सावरण्यासाठी क्लार्कला डॉक्टरांनी सात आठवडय़ांची विश्रांती सांगितली आहे. यामुळे ३ एप्रिल ते २६ मे या कालावधीत होणाऱ्या आयपीएमध्ये क्लार्क सहभागी होऊ शकणार नाही.
क्लार्कच्या अनुपस्थितीमुळे पुणे वॉरियर्स संघव्यवस्थापनाच्या अडचणी वाढल्या आहेत. युवराज सिंगने कर्णधारपदासाठी नकार दिल्यानंतर वॉरियर्सने क्लार्कचा कर्णधारपदासाठी प्राधान्याने विचार केला होता. पण आता त्यांना आपल्या योजनांमध्ये बदल करावा लागणार आहे.
यंदाच्या लिलावात पुणे वॉरियर्सने मायकेल क्लार्कला ४,००, ०० .. बोली लावत विकत घेतले. भारताच्या दौऱ्यातून तिसऱ्या कसोटीनंतर माघारी परतलेला क्लार्क पाठीच्या तसेच मांडीच्या दुखापतीसाठी विविध चाचण्यांना सामोरा गेला. त्यातूनच क्लार्कचे पाठीचे दुखणे बरे होण्यासाठी मोठा कालावधी असल्याचे स्पष्ट झाले.
मायकेल क्लार्कला १७व्या वर्षांपासून पाठदुखीची समस्या आहे. डिजनरेटिव्ह डिस्क या त्याच्या आजारासाठी कमीत कमी सात आठवडे विश्रांती आवश्यक असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी जस्टिन पालोनी यांनी सांगितले.
चाचण्यांमधून याआधी ज्या दुखापतीने सतवले होते, तीच दुखापत बळावली आहे. पाठीच्या शेवटच्या भागात त्याला वेदना जाणवत आहेत. या दुखण्यातून बाहेर येण्यासाठी त्याच्यावर विविध स्वरुपाचे उपचार सुरू आहेत. मात्र त्यासाठी वेळ लागेल असे पलोनी यांनी पुढे सांगितले. क्लार्कची दुखापत काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक आहे. हा त्रास पुन्हा भविष्यात उद्भवल्यास अधिक धोकादायक ठरू शकते. त्याला सध्या साध्या हालचाली करतानाही वेदना जाणवत आहे. हळूहळू तो या दुखण्यातून बाहेर पडेल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे वैद्यकीय पथक आणि देशातील तज्ञ डॉक्टर क्लार्कच्या दुखापतीवर देखरेख ठेवणार आहेत.
दरम्यान जुलै-ऑगस्ट मध्ये होणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेत क्लार्क खेळू शकेल. त्याला मांडीच्या दुखापतीनेही त्रस्त केले आहे. यामुळे त्याच्या पुनरागमनात अडचणी आहेत. मात्र अ‍ॅशेस साठी तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन संघात परतेल असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या पत्रकात म्हटले आहे.