इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्कने एकाच सामन्यात दोनवेळा हॅटट्रिक साधण्याचा पराक्रम केलाय. स्टार्कने ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत सामन्यात ही कमाल केली. शेफील्ड शील्डमध्ये न्यू साऊथ वेल्सकडून खेळताना स्टार्कने वेस्टर्न ऑस्ट्रेलियन संघाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने दोन्ही डावात हॅटट्रिक नोंदवण्याचा पराक्रम केला.

सोमवारी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या डावात त्याने हॅटट्रिक नोंदवली होती. त्यानंतर मंगळवारी दुसऱ्या डावात पुन्हा स्टार्कने अफलातून गोलंदाजी केली. त्याने या डावात हॅटट्रिक करताच क्रिकेटच्या मैदानात एका नव्या विक्रमाची नोंद झाली. स्टार्कच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर न्यू साऊथ वेल्सने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला तब्बल १७१ धावांनी पराभूत केले. दुसऱ्या डावात स्टार्कने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या जॅसन बेहरेनडॉर्फ, डेव्हिड मूडी, सायमन मॅक्किनला बाद केले.

शेफील्ड शील्डच्या इतिहासात एका सामन्यात दोनवेळा हॅटट्रिक घेण्याची ही पहिली वेळ आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात एका सामन्यात दोन हॅटट्रिक घेण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियन गोलंदाज टीजे मॅथ्यूज यांच्या नावावर आहे. त्यांनी १९१२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्यांनी असा पराक्रम केला होता. यापूर्वी मिचेल स्टार्कने बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर भारताविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात त्याने ७ बळी मिळवले होते. देशांतर्गत क्रिकेटमधील उत्तम कामगिरीतून आगामी अॅशेस मालिकेसाठी सज्ज असल्याचे संकेत स्टार्कने दिले आहेत.