देशभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवस लॉकडाऊन घोषित केला. या काळात जिवनावश्यक गोष्टींचा अपवाद वगळता इतर सर्व गोष्टी बंद रहाणार आहेत. नागरिकांना या काळात घराबाहेर पडता येणार नाहीये. क्रीडा क्षेत्रालाही या लॉकडाऊनचा चांगलाच फटका बसला आहे. बीसीसीआयने २९ मार्चला सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. सर्व भारतीय खेळाडू या काळात आपल्या घरी राहत परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारतीय संघाचा महत्वाचा गोलंदाज म्हणून ओळख असलेला मोहम्मद शमीही सध्या आपल्या घरात आहे. लॉकडाऊनच्या काळात शमीने आपल्या अंगातली एक छुपी कला सर्वांना दाखवून दिली आहे. एरवी मैदानात प्रतिस्पर्धी फलंदाजांची भंबेरी उडवणारा शमी हा तितकाच चांगला चित्रकार आहे. आपल्या इन्स्टाग्राम व्हिडीओवर एक पोट्रेट काढतानाचा व्हिडीओ शमीने पोस्ट केला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत शमीने आश्वासक कामगिरी बजावली होती. सध्या करोनामुळे आयपीएलच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मध्यंतरी बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएल खेळवण्याच्या विचारात असल्याचं समोर आलं होतं, मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.