भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहलीने धोनी बाबत ट्विट केले होते. नेटकऱ्यांनी या ट्विटचा संबंध थेट धोनीच्या निवृत्तीशी जोडला होता. क्रिकेट रसिकांच्या गैरसमजूतीतून निर्माण झालेला हा गोंधळ निस्तारण्यासाठी चक्क निवड समिती प्रमुख एम.एस.के.प्रसाद यांना पुढे यावे लागले होते. यानंतर आता स्वत: कर्णधार विराट कोहलीनेच याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरोधात टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत विराटने धोनीबाबत केलेल्या ट्विटवर स्पष्टीकरण दिले. “धोनीचा फोटो शेअर करताना माझ्या मनात काहीही नव्हते. घरात निवांत असताना तो फोटो माझ्या नजरेस पडला होता. तो फोटो मला इतका आवडला की लगेचच मी त्याला शेअर केले. या फोटोचा संबंध लोक धोनीच्या निवृत्तीशी जोडतील अशी पुसटशीही कल्पना मला नव्हती. अन्यथा मी त्या फोटोला अपलोड केलेच नसते. या घटनेने मला चांगलाच धडा शिकवला, या पुढे विचार न करता मी कोणताही फोटो अपलोड करणार नाही.” असे स्पष्टीकरण देत विराटने धोनीच्या निवृत्तीबाबत अफवांना फेटाळून लावले.

विराट कोहलीने केलेले ट्विट

या शिवाय विराटने भारताची दक्षिण आफिकेविरुद्ध केलेल्या तयारी बाबतही चर्चा केली. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला हरवण्यासाठी तयार आहेत. भारताकडे त्यांच्या तुलनेत उच्च प्रतिचा संघ आहे. त्यामुळे भारताला हरवणे सोपे नाही.