आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी कोण सांभाळणार याचं उत्तर अजुनही मिळालेलं नाही. धोनीच्या अनुपस्थितीत निवड समितीने ऋषभ पंतला संधी दिली. मात्र ऋषभला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही. यष्टींमागची ढिसाळ कामगिरी आणि बेजबाबदार फलंदाजी यामुळे नवीन वर्षात संघ व्यवस्थापनाने लोकेश राहुलला यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली. एकीकडे धोनी भारतीय संघात पुनरागमन करणार का अशी चर्चा सुरु असताना, भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफरने, धोनी-पंत आणि राहुल या तिघांना एकाचवेळी संघात स्थान मिळू शकतं असं म्हटलंय.

वासिम जाफरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या तिन्ही खेळाडूंसाठी एक पर्याय सुचवला आहे. जर धोनी तंदुरुस्त असेल तो भारतासाठी हुकुमाचा एक्का ठरु शकतो. यष्टींमागे त्याचा अनुभव आणि मधल्या फळीतली फलंदाजी आपण सर्वांनी अनुभवली आहे. धोनीला यष्टीरक्षणाची संधी दिल्यास राहुलवरचं यष्टीरक्षणाचं दडपण कमी होईल आणि भारताला डावखुऱ्या फलंदाजाची गरज असल्यास पंतलाही संघात खेळवता येईल.

वासिम जाफरने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर वासिम जाफर चाळीशी ओलांडल्यानंतरही रणजी क्रिकेट खेळत होता. विदर्भाकडून खेळताना वासिमने आपल्या संघाला दोनवेळा विजेतेपद मिळवून दिलं. सध्या वासिम जाफरकडे आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाची सुत्र आहेत. करोना विषाणूमुळे २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा ही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे.