अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू मुजीब उर रेहमान, ऑस्ट्रेलियातील स्थानिक टी-२० स्पर्धा बिग बॅश लीगमध्ये सहभागी होणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिस्बेन हिट संघाने मुजीबला आपल्या संघात समाविष्ट करुन घेतलं आहे. आगामी डिसेंबर महिन्यात बिग बॅशच्या नवीन पर्वाला सुरुवात होणार आहे.

आयपीएमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे प्रशिक्षक डॅनिअल व्हिटोरी यंदा ब्रिस्बेन हिट संघाला प्रशिक्षण देणार आहेत. मुजीबच्या सहभागानंतर व्हिटोरी यांनी आनंद व्यक्त केला आहे. “मुजीब हा उमदा फिरकीपटू आहे, त्याच्यात चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. आयपीएल, इंग्लंडमधील स्थानिक स्पर्धांमध्ये खेळल्यानंतर तो आता सर्व देशांच्या खेळपट्ट्यांवर चांगला खेळ करु शकतो असा मला विश्वास आहे.”

टी-२० सामन्यात पॉवर प्लेमध्ये मुजीब चांगली गोलंदाजी करतो. त्यामुळे संपूर्ण हंगाम तो आमच्या संघासाठी उपलब्ध असेल तर आम्हाला ते हवचं आहे, असंही व्हिटोरी म्हणाले. मुजीब हा राशिद खान, मोहम्मद नबी यांच्यानंतर बिग बॅश लीग खेळणारा तिसरा अफगाणी खेळाडू ठरला आहे. आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने ४ कोटी रुपयांच्या बोलीवर मुजीबला आपल्या संघात घेतलं होतं.

­­­