महिला एकदिवसीय क्रिकेट मालिका

कर्णधार जेमिमा रॉड्रिग्सच्या शानदार शतकाच्या जोरावर मुंबईने २३ वर्षीय महिलांचा एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेत विदर्भावर ४३ धावांनी विजय नोंदवला.

मंगळवारी सिव्हिल लाइन्स येथील विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मदानावर ही लढत झाली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने ४९.२ षटकांत १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भ ४४.५ षटकांत सर्वबाद १३२ धावांपर्यंत मजल मारू शकला.

प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली आणि ती अखेपर्यंत कायम राहिली. मात्र सलामीला आलेल्या जेमिमाने सावध फलंदाजी केली. एकाबाजूने फलंदाज निर्धारित वेळेत तंबूत रवाना होत असताना जेमिमाने संयम कायम ठेवत विदर्भाच्या प्रत्येक गोलंदाजांना चोख उत्तर देत ५८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मुंबई ११ धावांवर असताना वैभवी सोनवणेने सलामीवीर एस. राऊतला दोन धावांवर झेलबाद करून पहिले यश मिळवून दिले, तर आंचल वळंजू १४ धावांवर बाद झाली. मुंबईचे खेळाडू एकाबाजूने बाद होत असताना जेमिमाने खेळपट्टीवर कायम राहत आपले शानदार शतक केले. जेमिमाने ११६ चेंडूंत दहा चौकारांच्या मदतीने १०६ धावांची मोलाची खेळी साकारली आणि संघाला १७५ धावांपर्यंत पोहोचवून देण्यात कर्णधाराला साजेशी खेळी साकारली. मुंबईचा संघ ४९.२ षटकांत १७५ धावांवर सर्वबाद झाला.

विदर्भाच्या गोलंदाजीपुढे जेमिमा वगळता कोणत्याही खेळाडूला तग धरता आली नाही. एम. बोडखेने सर्वाधिक चार गडी बाद केले. प्रत्युत्तरात विदर्भाच्या सलामीवीरांना जेमिमाने लवकरच पहिला झटका दिला आणि ए. भोंगाडेला दहा धावांवर धावबाद केले. सलामीवीर एल. इनामदार (३१) दुसऱ्या बाजूने अर्धशतकाकडे कूच करत असताना जे. पवारने तिला झेलबाद केले. त्यानंतर कर्णधार दिशा कसाटकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा असताना ती आल्या पावली परतली. एस. धरणे (२२) तर वैष्णवी खांडेकरने (१८) धावांची खेळी साकारून विदर्भाच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. एन. कोहळेने एका बाजूने किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला मात्र, तिला एस. राऊतने (२८) धावांवर माघारी धाडले. त्यानंतरचे फलंदाजी झटपट बाद होत गेले आणि विदर्भाची खेळी ४४.५ षटकांत सर्वबाद १३२ धावांवर संपुष्टात आली. जेमिमाने फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही आपली चमक दाखवत तीन बळी टिपले, तर एम. दक्षिणीने दोन गडी बाद केले.