जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत सहभाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धेत पराक्रम गाजवणाऱ्या नाशिकच्या अंजना ठमकेने चीनमध्ये सुवर्णपदक जिंकून आपली ‘सुवर्णकन्या’ ही उपाधी आंतरराष्ट्रीय पातळीवरही सार्थ ठरवली आहे. युवा आशियाई क्रीडा स्पध्रेत स्पर्धेत भारताची निराशाजनक कामगिरी चालू असताना अंजनाने कविता राऊतच्या पावलांवर पाऊल ठेवत सुवर्णपदकाला गवसणी घालण्याची किमया साधली आहे.
ऑक्टोबर २०१०मध्ये नाशिक येथील भोसला सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर आयोजित जिल्हा शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत  ६०० मीटरचे अंतर केवळ १ मिनिट ४७ सेकंदांत पार करून सर्वाना आश्चर्यचकित करणाही अंजना भविष्यातील नाशिकचे भूषण असेल, असे भाकित प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी वर्तविले होते. हे भाकित अंजनाने खरे ठरविले. अंजनामधील चपळता हेरून सिंग यांनी तिला भोसला मैदानावरील ‘साई’ केंद्रात सरावासाठी येण्याचा आग्रह केला.
अंजनाचे गाव गणेशगाव हे नाशिकपासून सुमारे २० किलोमीटरवर असल्याने तिला दररोज ये-जा करणे कसे जमेल, असा प्रश्न तिचे वडील ढवळू ठमके यांनी उपस्थित केल्यावर सिंग यांनी भोसला विद्यालयाच्या व्यवस्थापनाशी बोलून तिला या शाळेत प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर नियमित सराव करणाऱ्या अंजनाचे नाव अल्पावधीतच गाजू लागले.
५६व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षांआतील गटात ६०० मीटरमध्ये, ५७व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत १७ वर्षांआतील गटात १५०० मीटरमध्ये आणि या वर्षी लखनौ येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ८०० मीटर धावण्यात सुवर्णपदक मिळविणाऱ्या अंजनाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेशसिंग यादव यांच्या हस्ते ‘नॅनो कार’ बक्षीस स्वरूपात देण्यात आली होती.