टाळेबंदीच्या काळात घरात राहताना शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा तंदुरुस्ती राखणे आवश्यक आहे, असे भारताचे मुख्य बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी सांगितले. करोना विषाणू संसर्गामुळे ज्याप्रमाणे जगावर आर्थिक मंदीचे सावट आहे तसेच क्रीडा क्षेत्रावरही आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा आटपून भारतात परतलेल्या गोपीचंद यांनी नियमाप्रमाणे तीन आठवडे विलगीकरणात काढले. ‘‘सध्या जग कठीण परिस्थितीतून जात आहे. प्रत्येकाची कारकीर्द या काळात पणाला लागली आहे. मात्र ही टाळेबंदी आवश्यक होती. या कठीण काळात फक्त क्रीडाक्षेत्रालाच नाही तर प्रत्येक उद्योग व्यवसायाला फटका बसणार आहे. मात्र नकारात्मक विचार मनात न आणता तंदुरुस्ती राखत स्वत:चा समतोल सांभाळणे गरजेचे आहे. भविष्यात सर्व काही सुरळीत होईल इतकीच आशा करायला हवी,’’ असे गोपीचंद यांनी सांगितले.

‘‘या काळात पगार कपात आणि कामगार कपात होण्याचा धोका आहे. केंद्र व राज्य सरकारकडूनही कर्मचाऱ्यांच्या पगार कपातीच्या घोषणा झाल्या आहेत. हे सहा महिने आयुष्यातील कठीण आहेत. गेल्या १०० वर्षांत अशा स्वरूपाची परिस्थिती जगाने अनुभवली नव्हती. यापूर्वीही जगावर संकटे आल्याची उदाहरणे इतिहासात आहेत. मात्र माणसांनी त्यावर मात केली आहे,’’ असे  गोपीचंद यांनी सांगितले.

गावस्कर आणि पुजाराकडून आर्थिक मदत

नवी दिल्ली : करोनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्याच्या इराद्याने महान क्रि के टपटू सुनील गावस्कर आणि कसोटीपटू चेतेश्वर पुजारा यांनी पंतप्रधान सहायता निधीसाठी आर्थिक मदत दिली आहे. गावस्कर यांनी ५९ लाखांची मदत के ली आहे, तर पुजाराने दिलेल्या मदतीचा आकडा स्पष्ट करण्यात आलेला नाही. मुंबईचा माजी कर्णधार अमोल मुझुमदारने ‘ट्विटर’च्या माध्यमातून गावस्करच्या मदतीविषयी माहिती दिली. गावस्कर यांनी पंतप्रधान सहायता निधीसाठी ३५ लाख रुपये, तर मुख्यमंत्री निधीसाठी २४ लाख रुपये दिले आहेत.  पुजाराने आपले योगदान देताना डॉक्टर्स, वैद्यकीय व्यावसायातील कर्मचारी, पोलीस आणि या कठीण काळात मदतीसाठी सरसावणाऱ्या सर्व आघाडीच्या वीरांचे आभार मानले.

जागतिक टेबल टेनिस स्पर्धेच्या नव्या तारखा जाहीर

लॉसाने : जागतिक अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेच्या नव्या तारखा आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाने (आयटीटीएफ) मंगळवारी जाहीर केल्या. गेल्या महिन्यात होणारी ही स्पर्धा आता २७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. करोनामुळे बुसान येथे २२ ते २९ मार्च या कालावधीत होणारी जागतिक अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर ‘आयटीटीएफ’च्या आपत्कालीन कार्यकारिणीच्या बैठकीत २१ ते २८ जून अशा तारखांची तरतूद करण्यात आली होती. परंतु ‘आयटीटीएफ’ने ३० जूनपर्यंत सर्व स्पर्धा स्थगित केल्यामुळे जागतिक स्पर्धेच्या पुन्हा नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या.

‘वाडा’कडून सावधतेचा इशारा

लंडन : करोनामुळे जगात निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीचा फायदा घेऊन उत्तेजक द्रव्य पदार्थाचे सेवन करावे असा विचार खेळाडू करीत असतील, तर ते स्वत:चीच फसवणूक करीत आहेत, असा इशारा जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेचे (वाडा) अध्यक्ष विटोल्ड बँका यांनी दिला आहे. करोनाच्या कालखंडात उत्तेजक चाचण्या घेणे कठीण जात आहे. परंतु खेळाडूंवर लक्ष ठेवणारी अन्य शस्त्रे ‘वाडा’ आणि राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थांकडे उपलब्ध आहेत, असे बँका यांनी सांगितले. करोनामुळे कॅनडा आणि रशियाने उत्तेजक चाचण्या स्थगित केल्या आहेत, तर ब्रिटनमधील चाचण्यांची संख्या रोडावली आहे, असे बँका यांनी सांगितले.