ग्लेन फिलीप्सच्या झंजावाती शतकाच्या जोरावर दुसऱ्या टी-२० सामन्यात यजमान न्यूझीलंडने वेस्ट इंडिजसमोर २३९ धावांचं विशाल आव्हान उभं केलं. यानंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडने ७२ धावांनी विजय मिळवत ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. फिलीप्सने विंडीजच्या गोलंदाजांची धुलाई करताना ५१ चेंडूत १० चौकार आणि ८ षटकारांसह १०८ धावा केल्या. त्याला डेवॉन कॉनवेने नाबाद ६५ धावांची खेळी करत चांगली साथ दिली.

विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्टीन गप्टिल आणि टिम सेफर्ट यांनी संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. थॉमसने सिफर्टचा त्रिफळा उडवत विंडीजला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर ठराविक अंतराने गप्टीलही माघारी परतला. यानंतर मैदानावर आलेल्या कॉनवे आणि फिलीप्स जोडीने मैदानावर चौकार-षटकारांची आतिषबाजी करत विंडीजच्या गोलंदाजांना पळता भुई थोडी केली.

२३९ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या विंडीजच्या संघाची सुरुवातच खराब झाली. ब्रँडन किंग जेमिन्सनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. यानंतर विंडीजच्या डावाला लागलेली गळती थांबली. एकही फलंदाज मैदानावर फारकाळ तग धरु शकला नाही. विंडीजचा संघ १६६ धावांपर्यंत मजल मारु शकला. न्यूझीलंडकडून जेमिन्सन आणि सँटनरने प्रत्येकी २-२ तर टीम साऊदी-फर्ग्युसन-सोधी आणि निशम या चौकडीने प्रत्येकी १-१ बळी घेतला.