लोकेश राहुल हा ट्वेन्टी- २० क्रिकेट सामन्यांमध्ये हिट विकेट होणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. जीवन मेंडिसच्या गोलंदाजीवर लोकेश राहुलचा पाय यष्टीला लागला आणि या नकोशा ‘विक्रमा’ची नोंद राहुलच्या नावावर झाली.

निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी- २० क्रिकेट स्पर्धेत सोमवारी भारताचा सामना श्रीलंकेशी झाला. रिषभ पंतच्या जागी संघात स्थान मिळालेला लोकेश राहुल जबाबदारीने खेळत होता. मात्र, १८ धावांवर खेळत असताना मेंडिसच्या गोलंदाजीवर लोकेश राहुलचा पाय यष्टीला लागला. हिट विकेट झाल्याने लोकेशला माघारी परतला. टी- २० त हिट विकेट होणारा पहिला भारतीय अशा नकोशा विक्रमाची नोंद लोकेश राहुलच्या नावावर झाली आहे. दहाव्या षटकात तो बाद झाला.

ट्वेंटी- २० क्रिकेटमध्ये हिट विकेट होणारा तो नववा फलंदाज ठरला आहे. या यादीत ए बी डिव्हिलियर्स, श्रीलंकेचा दिनेश चंडिमल आणि पाकिस्तानच्या मिसबाह उल हक, मोहम्मद हाफीज यांचा समावेश आहे.  कसोटीत हिट विकेट होणारे लाला अमरनाथ हे पहिले भारतीय फलंदाज ठरले होते. १९४९ मध्ये ते हिट विकेट झाले होते. तर एकदिवसीय सामन्यात नयन मोंगिया (१९९५) हिट विकेट होणारा पहिला भारतीय फलंदाज आहे.

दरम्यान, सोमवारी झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर सहा विकेट राखून विजय मिळवला. मनीष पांडे (नाबाद ४२) आणि दिनेश कार्तिक (नाबाद ३९) यांची फलंदाजी आणि शार्दुल ठाकूरच्या भेदक माऱ्यामुळे भारताला हा विजय मिळवला.