बेरेट्टिनी, प्लिस्कोव्हा, सकारीचीही आगेकूच

न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने ‘गोल्डन स्लॅम’च्या दिशेने यशस्वी कूच सुरू ठेवली आहे. जोकोव्हिचने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत जेन्सन ब्रूक्सबीचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. इटलीच्या माटेओ बेरेट्टिनीलाही स्पर्धेत आगेकूच करण्यात यश आले. महिलांमध्ये चौथ्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हा आणि मारिया सकारी यांनी विजयी घोडदौड सुरू ठेवली.

पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत जोकोव्हिचने २० वर्षीय अमेरिकन खेळाडू ब्रूक्सबीवर १-६, ६-३, ६-२, ६-२ अशी मात केली. यंदा सलग चौथे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या जोकोव्हिचने या सामन्याचा पहिला सेट मोठय़ा फरकाने गमावला. मात्र, त्याने दमदार पुनरागमन करत पुढील तिन्ही सेट जिंकत सामन्यात बाजी मारली. हा जोकोव्हिचचा यंदा ग्रँडस्लॅम स्पर्धातील सलग २५वा विजय ठरला. तसेच ब्रूक्सबीच्या पराभवामुळे अमेरिकेचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे. अमेरिकन खुल्या स्पर्धेत यजमानांच्या एकाही पुरुष किंवा महिला खेळाडूला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयश आल्याची ही पहिलीच वेळ आहे. जोकोव्हिचचा पुढील फेरीत सहाव्या मानांकित बेरेट्टिनीशी सामना होईल. बेरेट्टिनीने चौथ्या फेरीत जर्मनीच्या ऑस्कर ओट्टेचा ६-४, ३-६, ६-३, ६-२ असा पराभव केला.

महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्लिस्कोव्हाने चेक प्रजासत्ताकच्याच अनास्तासिया पाव्हल्यूचेंकोव्हाला ७-५, ६-४ असे पराभूत केले. तसेच मारिया सकारीने २०१९च्या विजेत्या बियांका आंद्रेस्कूवर ६-७ (२-७), ७-६ (८-६), ६-३ अशी, तर एमा राडूकानूने शेल्बी रॉजर्सवर ६-२, ६-१ अशी मात केली.

बोपण्णा-डोडिगची झुंज अपयशी

भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा क्रोएशियन साथीदार इव्हान डोडिग यांना अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यांनी पुरुष दुहेरीच्या सामन्यात राजीव राम आणि जो सालिसब्युरी या चौथ्या मानांकित जोडीला झुंज दिली. परंतु त्यांची ही झुंज अपयशी ठरली आणि बोपण्णा-डोडिग जोडीने हा सामना ७-६ (७-३), ४-६, ६-७ (३-७) असा गमावला. बोपण्णाच्या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.