१४ ऑगस्ट १९४८ रोजी डॉन ब्रॅडमन आपला अखेरचा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले. ओव्हलच्या मैदानावर प्रतिष्ठेची अ‍ॅशेस मालिका सुरु होती. ऑस्ट्रेलियाने मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली होती. तरीही अखेरची कसोटी खेळणाऱ्या आपल्या कर्णधाराला विजयी निरोप द्यायचं ऑस्ट्रेलियाच्या संघाने ठरवलं होतं. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात अवघ्या ५२ धावा करु शकल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपायला अवघे काही तास शिल्लक असताना ब्रॅडमन मैदानात उतरले. मैदानात उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत ब्रॅडमन यांचं कौतुक केलं तर इंग्लंडच्या खेळाडूंनीही आपली टोपी काढत ब्रॅडमन यांचा सत्कार केला. इंग्लंडचा फिरकीपटू एरिक होलिसचा पहिला चेंडू ब्रॅडमन यांनी खेळून काढला. मात्र लगेच दुसऱ्या चेंडूवर होलिसची गुगली समजण्यात ब्रॅडमन चुकले आणि बाद होऊन माघारी परतले.

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात विजय मिळवला असला तरीही ब्रॅडमन यांना कसोटी कारकिर्दीत ७ हजार धावांचा टप्पा तीन आकडी सरासरी पूर्ण करण्यासाठी ४ धावा कमी पडल्या. कारकिर्दीच्या अखेरीस ब्रॅडमन यांची सरासरी होती ९९.९४…ब्रॅडमन यांनी आपला अखेरचा सामना खेळल्यानंतर तब्बल ४२ वर्षांनी याच दिवशी १७ वर्षाच्या सचिन तेंडुलकरने मँचेस्टर येथील ओल्ड ड्रॅफर्डच्या मैदानावर आपलं पहिलं वहिलं कसोटी शतक झळकावत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या डावात अडचणीत सापडलेल्या भारताला सचिनच्या शतकाने वाचवलं.

अवश्य वाचा – १४ ऑगस्ट १९९० : सचिनच्या पहिल्या कसोटी शतकाला आज लोटली तीन दशकं

यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनने केलेली बहारदार खेळी सर्वांनी अनुभवली. खुद्द ब्रॅडमन यांनी आपल्या ९० व्या वाढदिवशी सचिन आणि शेन वॉर्न या दोन महान खेळाडूंना आमंत्रित केलं होतं. यावेळी ब्रॅडमन यांनी सचिनच्या खेळाचं कौतुक केलं. सचिनच्या खेळीत मला आपला भास होतो असंही ब्रॅडमन म्हणाले होते. पुढे जाऊन सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम रचले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकांसह, वन-डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला खेळाडू असे अनेक विक्रम सचिनच्या नावे जमा आहेत. याच कारणासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४ ऑगस्ट ही तारीख महत्वाची मानली जाते.

अवश्य वाचा – पहिले कसोटी शतक नेहमीच खास!