इंग्लंडला फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवत सामन्यात ९ विकेट्स टिपण्याची करामत करणाऱ्या प्रग्यान ओझाने आयसीसी क्रमवारीतही झेप घेतली आहे. धडाकेबाज फलंदाज केव्हिन पीटरसनला दोन्ही डावात चकवणाऱ्या ओझाने गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल पाच गोलंदाजांमध्ये स्थान पटकावले आहे. दुसऱ्या डावात झुंजार खेळी करणाऱ्या अ‍ॅलिएस्टर कुकचा निर्णायक बळी मिळवत ओझाने सामना भारताच्या बाजूने फिरवला.
अव्वल वीस गोलंदाजांमध्ये झहीर खान चौदाव्या स्थानी तर आर अश्विन १८व्या स्थानी आहेत.
विशेष म्हणजे कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत एकाही भारतीय फलंदाजाला अव्वल वीस खेळाडूंमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. इंग्लंडविरुद्ध द्विशतक झळकावत भारतीय विजयाचा पाया रचणाऱ्या चेतेश्वर पुजाराने ३५ वरून २४ व्या स्थानी झेप घेतली आहे. बऱ्याच कालावधीनंतर कसोटी शतक नावावर करणारा वीरेंद्र सेहवाग २३ वरून २२व्या स्थानावर स्थिर आहे. १७६ धावांची झुंजार प्रदीर्घ खेळी करीत इंग्लंडचा डावाचा पराभव टाळणाऱ्या अ‍ॅलिस्टर कुकने अव्वल दहामध्ये धडक मारली आहे. तो सातव्या स्थानी आहे. मॅट प्रॉयर कारकीर्दीतील सर्वोच्च स्थानावर अर्थात १८व्या स्थानी विराजमान आहे.