पाव्हल्यूचेन्कोव्हा, झिदानसेक प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत

एपी, पॅरिस

स्लोव्हेनियाची तामरा झिदानसेक आणि रशियाची ३१वी मानांकित अ‍ॅनास्तासिया पाव्हल्यूचेन्कोव्हा या बिगरनामांकित टेनिसपटूंनी शानदार कामगिरी करत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मजल मारली. या दोघींनी पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.

महिला एकेरीतील दिवसाच्या पहिल्या उपांत्यपूर्व लढतीत २३ वर्षीय झिदानसेकने स्पेनच्या पाऊला बॅडोसावर ७-५, ४-६, ८-६ अशी तीन सेटमध्ये मात करून कारकीर्दीत प्रथमच एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली. २ तास २६ मिनिटे रंगलेल्या या लढतीत झिदानसेकने विजय मिळवून ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी स्लोव्हेनियाची पहिली महिला टेनिसपटू ठरण्याचा मान मिळवला. आता गुरुवारी होणाऱ्या उपांत्य लढतीत तिच्यासमोर अनास्तासिया पावल्यूचेन्कोव्हा हिचे आव्हान असेल.

पाव्हल्यूचेन्कोव्हा हिने ५२व्या प्रयत्नांत पहिल्यांदा उपांत्य फेरी गाठताना आपलीच दुहेरीतील सहकारी एलेना रबाकिना हिच्यावर मात केली. पहिला सेट गमावल्यानंतर पाव्हल्यूचेन्कोव्हाने जोमाने पुनरागमन करत उपांत्यपूर्व फेरीची लढत ६-७ (२/७), ६-२, ९-७ अशी जिंकली.

कझाकस्तानच्या २१व्या मानांकित रबाकिनाने पहिल्याच सेटमध्ये ४-१ अशी आघाडी घेत आश्वासक सुरुवात केली. पण पाव्हल्यूचेन्कोव्हाने तिला चोख प्रत्युत्तर देत हा सेट टाय-ब्रेकपर्यंत नेला. टाय-ब्रेकमध्येही रबाकिनाने ५-० अशी आगेकूच करत पहिला सेट आपल्या नावावर केला.

दुसऱ्या सेटमध्ये  पाव्हल्यूचेन्कोव्हाचे वर्चस्व राहिले. निर्णायक सेटमध्ये दोघींचा तोडीस तोड खेळ सुरू असताना १६व्या गेममध्ये रबाकिनाला आपल्या सव्‍‌र्हिसवर गुण राखण्यात अपयश आले. त्यामुळे पाव्हल्यूचेन्कोव्हाला उपांत्य फेरीत आगेकूच करता आली.

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा झ्वेरेव्हची आगेकूच

जर्मनीच्या सहाव्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्ह याने स्पेनच्या अलेजांड्रो डेव्हिडोव्हिच फोकिना याचा सरळ तीन सेटमध्ये पाडाव करत उपांत्य फेरी गाठली आहे. झ्वेरेव्हने उपांत्यपूर्व फेरीची ही लढत ६-४, ६-१, ६-१ अशी जिंकली. त्याला उपांत्य फेरीत स्टेफानोस त्सित्सिपास आणि डॅनिल मेदवेदेव यांच्यातील विजेत्याशी लढत द्यावी लागेल.

ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर संमिश्र भावना दाटून आल्या आहेत. आपल्याच मैत्रिणीचे आव्हान परतवून लावणे खडतर असते. सध्या माझ्याकडून चांगला खेळ होत असून अधिक सकारात्मक झाले आहे.

– अ‍ॅनास्तासिया पाव्हल्यूचेन्कोव्हा

बॅडोसाविरुद्ध मला विजयासाठी संघर्ष करावा लागेल, याची जाणीव होती. मात्र मी सर्वस्व झोकून दिले. कारकीर्दीत प्रथमच उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरल्यामुळे मी आनंदी आहे. या विजयामुळे उपांत्य सामन्यासाठी अधिक उत्साहाने तयारी करण्याकरता प्रेरणा मिळाली आहे.

– तामरा झिदानसेक