मार्सेली फुटबॉल क्लबचे माजी अध्यक्ष पेप डीऑफ यांचे करोनामुळे वयाच्या ६८व्या वर्षी मंगळवारी निधन झाले. करोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना सेनेगल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते सेनेगलमधील पहिले करोनाबाधित ठरले. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

डीऑफ यांना मंगळवारी करोनावरील पुढील उपचारांसाठी फ्रान्समधील नीस येथे विमानाने नेण्यात येणार होते. मात्र त्यांची प्रकृती फारच खालावल्याने त्यांना विमान प्रवासासाठी मज्जाव करण्यात आला होता. आफ्रिका खंडातील छाड येथे जन्म झालेल्या डीऑफ यांच्याकडे फ्रान्सचे आणि सेनेगलचे नागरिकत्व होते. त्यांनी २००५ ते २००९ या काळात मार्सेली फुटबॉल क्लबचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यांच्या कारकीर्दीतच मार्सेली संघाने फ्रान्समधील ‘लीग-१’ ही सर्वोत्तम फुटबॉल स्पर्धा २०१०मध्ये जिंकली होती.  वयाच्या १८व्या वर्षी मार्सेली येथे वास्तव्यास आल्यानंतर त्यांनी लष्करातून कारकीर्द सुरू केली होती. मात्र नंतर पत्रकार म्हणून काम करणारे डीऑफ हे फुटबॉल प्रशासनाकडे वळले.

पॅट्रिक मॅकेन्रो यांना करोनाची बाधा

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या डेव्हिस चषक टेनिस संघाचे माजी कर्णधार पॅट्रिक मॅकेन्रो यांना करोनाची बाधा झाली आहे. पॅट्रिक हे सात ग्रँडस्लॅम विजेत्या अमेरिकेचे महान माजी टेनिसपटू जॉन मॅकेन्रो यांचे धाकटा भाऊ आहेत. ‘‘करोनाची बाधा झाली असला तरी माझी प्रकृती ठीक आहे. माझ्यातील करोनाची लक्षणे आता बरी व्हायला लागली आहेत,’’ असे त्यांनी म्हटले आहे. पॅट्रिक यांनी कारकीर्दीत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे १९८९मध्ये दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते.