गेले ३ महिने सुरु असलेलं प्रो-कबड्डीचं पाचवं पर्व अखेर संपुष्टात आलं. गतविजेत्या पाटणा पायरेट्सने अंतिम फेरीत गुजरात फॉर्च्युनजाएंट संघावर एकतर्फी मात करत विजेतेपद पटकावलं. या हंगामात दबंग दिल्लीच्या संघाला मात्र अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. ‘अ’ गटात दबंग दिल्लीचा संघ २२ सामन्यांत ५ विजयांसह अखेरच्या स्थानावर राहिला.

अवश्य वाचा – प्रो कबड्डीचा तीन महिन्यांचा कालावधी अतिशय कंटाळवाणा!

दबंग दिल्लीचं प्रतिनिधीत्व केलेला इराणचा मिराज शेख या हंगामानंतर आपल्या मायदेशी परतला आहे. गेले ३ महिने मिराज आपल्या परिवारापासून दूर होता. यामुळे घरी गेल्यानंतर मिराजने सर्वप्रथम आपली लाडकी मुलगी सोफीयासोबत वेळ घालवणं पसंत केलं. मिराज आणि त्याची लहानगी मुलगी सोफीया यांच्यातले काही निवांत क्षण दबंग दिल्लीच्या संघाने आपल्या फेसबूक पेजवर शेअर केले आहेत.

मिराजने या हंगामात दबंग दिल्लीच्या कर्णधारपदासह चढाईची धुराही सांभाळली. २० सामन्यांमध्ये मिराजने १०४ गुणांची कमाई केली. यात ९६ गुण मिराजने चढाईत तर ८ गुण हे बचावफळीत मिळवले होते. मिराजला त्याचा इराणी साथीदार अबुफजल मग्शदुलूने चांगली साथ दिली. मात्र इतर खेळाडूंनी या हंगामात पुरती निराशा केल्यामुळे दोन्ही खेळाडूंचे प्रयत्न तोकडेच पडले. त्यामुळे पुढच्या हंगामात दबंग दिल्लीचा संघ कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Final – गतविजेत्या पाटणा पायरेट्सची विजयाची हॅटट्रिक, अंतिम फेरीत गुजरातवर मात