प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात पुणेरी पलटणचा प्रवास संपला आहे. पाटणा पायरेट्सने बाद फेरीच्या तिसऱ्या सामन्यात पाटण्यावर मात करत अंतिम फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं. कालच्या सामन्यात वादळासारखी खेळी करणाऱ्या प्रदीप नरवालने दुसऱ्या सत्रात एका चढाईत ५ गुणांची कमाई करत सामन्यात पारडं आपल्या संघाच्या बाजूने फिरवलं. प्रदीप नरवालने सामन्यात चढाईत १९ गुणांची कमाई केली. पाटण्याने पुणेरी पलटणवर ४२-३२ अशी मात करत पुढच्या फेरीत प्रवेश केला.

पाटणा पायरेट्सने आपल्या बादफेरीतील पहिल्या सामन्यातला फॉर्म कायम ठेवत या सामन्यातही आक्रमक खेळाला सुरुवात केली. कर्णधार प्रदीप नरवालने वादळी चढाई करत पुणेरी पलटणला ऑलआऊटचा धक्का दिला. मात्र हा फॉर्म त्यांना कायम ठेवता आला नाही. यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे प्रदीप वगळता एकाही खेळाडूला सामन्यात गुण कमावता आले नाहीत. विशाल मानेने सामन्यात बचावात अवघा १ गुण कमावला. मात्र प्रदीपच्या खेळीने पाटण्याने पुण्याला ऑलआऊट करत सामन्यात चांगली सुरुवात केली. प्रदीपच्या खेळीपुढे पुणेरी पलटणचा संघ कोलमडणार असं वाटत असतानाच पुणेरी पलटणने सामन्यात जोरदार पुनरागमन केलं.

कर्णधार दीपक हुडा आणि राजेश मोंडलने पहिल्या सत्रात ऑलआऊट झाल्यानंतर सामन्याचं पारडं आपल्या बाजूने फिरवली. दीपक आणि राजेशने पाटण्याच्या बचावफळीला चुक करायला भाग पाडत सामन्यात आघाडी घेतली पहिल्या सत्राच्या अखेरीस पुण्याने आपल्यावर असलेल्या लोणची परतफेड करत मध्यांतरापर्यंत २०-१३ अशी आघाडी घेतली. यात संदीप नरवाल आणि धर्मराज चेरलाथन यांनी बचावात काही चांगल्या गुणांची कमाई करत संघाला आघाडी मिळवून देण्यात आपला खारीचा वाटा उचलला.

मध्यांतरानंतर पाटणा पायरेट्सने आपल्या आराखड्यांमध्ये बदल करुन बदली खेळाडूंना संघात जागा दिली. मात्र प्रदीप नरवालचा अपवाद वगळता अन्य खेळाडूंकडून सामन्यात निराशाजनक खेळ सुरुच राहिला. पाटण्याच्या सर्वात अनुभवी बचावपटूंनी सामन्यात क्षुल्लक चुका करत पुणेरी पलटण संघाला गुण बहाल केले. यामुळे सामना संपण्यासाठी ८ मिनीटांचा कालावधी असताना पुणेरी पलटणकडे १० गुणांची भक्कम आघाडी होती. दुसऱ्या सत्रानंतर आपल्या संघाची आघाडी कायम ठेवण्यात पुण्याकडून गिरीश, धर्मराज आणि संदीप नरवाल या बचावपटूंनी महत्वाचा वाटा उचलला. महत्वाची गोष्ट म्हणजे पाटण्याचा कर्णधार प्रदीप नरवालला संघाबाहेर ठेवण्यात पुण्याच्या बचावफळीला यश आलं. याचा पुरेपूर फायदा घेत दीपक हुडा आणि राजेश मोंडलने सामन्यावर पुण्याच्या संघाची पकड मजबूत केली.

पुणेरी पलटणचा संघ सामन्यात बाजी मारणार असं वाटत असतानाच, प्रदीप नरवालने सामन्यात हरियाणाविरुद्धच्या चढाईची पुनरावृत्ती केली. एकाच चढाईत पुण्याच्या ५ खेळाडू संघाबाहेर करत सामन्यात रंगत आणली. प्रदीपच्या या हल्ल्यामुळे पुण्याचा संघ काहीकाळासाठी बॅकफूटला ढकलला गेला. यानंतर पुण्याच्या एकमेव खेळाडूला बाद करत पाटण्याने सामन्यात ३१-३० अशी आघाडी घेत अखेरच्या ४ मिनीटात पारडं आपल्या संघाच्या बाजूने फिरवलं.

प्रदीपच्या खेळीने आत्मविश्वास भरलेल्या पाटणा पायरेट्सने पुण्यावर पुन्हा दबाव टाकण्यास सुरुवात केली. कर्णधार दीपक हुडाची पकड करत पाटण्याने अखेरच्या काही मिनीटांमध्ये पुण्याला आणखी एक धक्का दिला. त्यातच पुण्याच्या संदीप नरवाल आणि पाटण्याच्या विजय या खेळाडूला पंचानी येलो कार्ड दाखवत संघाबाहेर केलं. यानंतर पुण्याच्या खेळाडूंनी सामन्यात परतण्याचे सर्व प्रयत्न पाटण्याच्या बचावफळीने उधळून लावले. त्यामुळे पहिल्या सामन्याप्रमाणे समयसुचकता दाखवत पाटणा पायरेट्सने पुण्याच्या हातातून विजय हिसकावून घेत अंतिम फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं. चेन्नईत होणाऱ्या अंतिम सामन्यात दाखल होण्यासाठी पाटण्याला बंगाल वॉरियर्सचा सामना करावा लागणार आहे.