प्रो-कबड्डीच्या बाद फेरीच्या पहिल्या सामन्यात पुणेरी पलटणने उत्तर प्रदेशवर मात करत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. शेवटच्या सेकंदापर्यंत रंगलेल्या या सामन्यात पुणेरी पलटणने उत्तर प्रदेशचा ४०-३८ ने पराभव करत स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं. या पराभवामुळे पाचव्या पर्वात पदार्पण केलेल्या उत्तर प्रदेशचा प्रवास संपुष्टात आला आहे.

सामन्याच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशच्या संघाने आक्रमक पवित्रा आजमावला. सुरुवातीच्या काही मिनीटांमध्येच उत्तर प्रदेशच्या संघाने सामन्यात ५-० अशी आघाडी घेतली. कर्णधार नितीन तोमर आणि रिशांक देवाडीगाने पुण्याच्या बचावफळीला खिंडार पाडलं. पुण्याने काही गुण कमावत सामन्यात आपलं आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची डाळ काही शिजली नाही. पहिल्या सत्रात ऑलआऊट झाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या संघाकडे १०-३ अशी मोठी आघाडी होती. मात्र दीपक हुडाच्या पुणेरी पलटणने जोरदार कमबॅक करत उत्तर प्रदेशला चांगलच आव्हान दिलं.

पुण्याकडून कर्णधार दीपक हुडाने चढाईत काही सुरेख गुणांची कमाई करत आपल्या संघाची पिछाडी भरुन काढली. त्याला उजवा कोपरारक्षक गिरीश एर्नेकने काही सुरेख पकडी करत चांगली साथ दिली. पुण्याच्या राजेश मोंडल आणि अन्य खेळाडूंना पहिल्या सत्रात फारशी चमक दाखवता आली नाही. मात्र दिपक हुडाने आपल्या खेळाच्या जोरावर मध्यांतरापर्यंत आपल्या संघाला १८-१८ अशी बरोबरी साधून दिली.

मध्यांतरानंतर पुणेरी पलटणने मात्र आपल्या खेळाचा रोख बदलला. सुरुवातीपासूनच आक्रमक चढाया करत पुणेरी पलटणच्या संघाने उत्तर प्रदेशवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. या दबावाखाली उत्तर प्रदेशची बचावफळी पुरती फसली. पुण्याच्या चढाईपटूंची पकड करण्याच्या नादात काही सोप्पे गुण उत्तर प्रदेशने गमावले. दुसऱ्या सत्रात दीपक हुडाला राजेश मोंडल आणि मराठमोळ्या अक्षय जाधवने उत्तम साथ देत आपल्या संघाची आघाडी वाढवण्यात मदत केली. दुसऱ्या बाजूने गिरीश एर्नेकने उत्तर प्रदेशच्या चढाईपटूंवर अंकुश लावत उत्तर प्रदेशला सामन्यात आणखी एकदा ऑलआऊट केलं. या धक्क्यामुळे उत्तर प्रदेशचा संघ सामन्यात बॅकफूटलला ढकलला गेला.

सामन्यात अखेरची १० मिनीटं शिल्लक असताना उत्तर प्रदेशच्या संघाने पुन्हा सामन्यात पुनरागमन करण्यास सुरुवात केली. पुण्याचा कर्णधार दीपक हुडा, कोपरारक्षक गिरीश एर्नेकला बाद करत उत्तर प्रदेशने पुण्यावर दबाव टाकण्यात सुरुवात केली. पाठोपाठ राजेश मोंडललाही उत्तर प्रदेशच्या बचावफळीने बाद करुन आपली पिछाडी कमी केली. यानंतर पुण्याचे ३ खेळाडू संघात बाकी राहिले असताना रिशांक देवाडीगाने एका चढाईत २ गुणांची कमाई करत पुण्याच्या संकटात आणखी भर टाकली. यानंतर उरलेल्या एका खेळाडूला बाद करुन उत्तर प्रदेशने सामन्यात ३४-३१ असं पुनरागमन केलं.

सामन्यात ३ मिनीटांचा खेळ शिल्लक असताना संदीप नरवालने रिशांक देवाडीला बॅकहोल्ड करत आपल्या उत्तर प्रदेशच्या महत्वाच्या चढाईपटूला संघाबाहेर केलं. संदीप नरवालच्या या खेळामुळे पुण्याने सामन्यातली आपली १-२ गुणांची नाममात्र आघाडी कायम ठेवली. याला उत्तर प्रदेशने बोनस पॉईंट घेण्याचा सपाटा लावत अखेरच्या ३९ सेकंदात पुण्याची आघाडी ३९-३८ अशी एका गुणावर आणून ठेवली. त्यामुळे अखेर या सामन्यात कोण विजय मिळवणार अशी रंगत निर्माण झाली होती. सामना संपायला शेवटची ९ मिनीटं शिल्लक राहिलेली असताना, उत्तर प्रदेशने उंचपुऱ्या महेश गौडला चढाईसाठी पाठवलं. मात्र संदीप नरवालने मध्य रेषेवर महेश गौडची पकड करत ४०-३८ अशा फरकाने सामना पुण्याच्या नावे केला.