प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामानंतर, निवृत्ती स्विकारलेल्या अनुप कुमारने पुन्हा एकदा पुनरागमन केलं आहे. सातव्या हंगामात अनुप कुमार मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे, पुणेरी पलटण संघाने अनुप कुमारची मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे.

प्रो-कबड्डीचे पहिले 5 हंगाम अनुप कुमारने यू मुम्बा संघाचं नेतृत्व केलं होतं. सहाव्या हंगामात जयपूर पिंक पँथर्सने अनुपला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं. मात्र गेल्या काही हंगामात अनुपच्या कामगिरीमध्ये बरीच घसरण झाली होती, त्यामुळे सहाव्या हंगामाच्या अखेरीस अनुपने निवृत्तीचा निर्णय घेतला. यानंतर सातव्या हंगामापासून अनुप पुन्हा एकदा कबड्डीच्या मॅटवर प्रशिक्षकपदाच्या भूमिकेत दिसणार आहे.

अनुप कुमार हा प्रो-कबड्डीतला सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून ओळखला जातो. आपल्या अनुभवी नेतृत्वाच्या जोरावर अनुपने भारतीय कबड्डी संघाला अनेक विजेतेपदं मिळवून दिली आहेत. त्याच्या याच अनुभवाचा पुणेरी पलटण संघाला फायदा होईल, असं मत पुणेरी पलटण संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश कांडपाल यांनी व्यक्त केलं. दरम्यान अनुप कुमारनेही पुणेरी पलटण संघाचे आपल्याला संधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत.