प्रो-कबड्डीला अखेरीस नवीन विजेता मिळाला आहे. अहमदाबादच्या मैदानात शनिारी संध्याकाळी पार पडलेल्या अंतिम सामन्यात बंगाल वॉरियर्सने दबंग दिल्लीवर मात करत सातव्या हंगामाचं विजेतेपद पटकावलं आहे. अडखळत्या सुरुवातीनंतरही बंगालने दमदार पुनरागमन करत दिल्लीची झुंज मोडून काढली. साखळी फेरीपासून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या दिल्ली संघाला अंतिम फेरीत आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. बचावफळीचं अपयश हे दिल्लीच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं.

पहिल्या सत्रात दबंग दिल्लीने आपल्या साखळी फेरीतला फॉर्म कायम ठेवत आक्रमक सुरुवात केली. नवीन कुमारने पुन्हा एकदा आक्रमक चढाया करत दिल्लीला आघाडी मिळवून दिली. पहिल्या काही मिनीटांमध्ये दिल्लीने ५ गुणांची आघाडी घेतली. मणिंदर सिंहच्या अनुपस्थितीत खेळणारा बंगालचा संघ सुरुवातीच्या काही मिनीटांमध्ये अडखळत खेळताना दिसला. मात्र इराणचा चढाईपटू मोहम्मद नबीबक्षने पुन्हा एकदा सामन्याची सुत्र आपल्या हाती घेत दिल्लीला चांगली झुंज दिली. नबीबक्षच्या या खेळामुळे बंगालने दमदार पुनरागमन करत सामन्यात बरोबरी साधली. पहिल्या सत्रात दिल्लीची बचावफळी गुणांची कमाई करु शकली नाही, ज्यामुळे पहिल्या सत्राअखेरीस बंगालने १७-१७ अशी बरोबरी साधली.

दुसऱ्या सत्रात बंगालने सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललं. मोहम्मद नबीबक्षच्या साथीने सुकेश हेगडेनेही चढाईत गुणांची कमाई करत दिल्लीच्या बचावफळीला खिंडार पाडलं. याचसोबत बंगालच्या बचावफळीनेही आपल्या चढाईपटूंना उत्तम साथ दिली. अखेरच्या सत्रात दबंग दिल्लीच्या नवीन कुमारने चढाईत काही गुणांची कमाई करत बंगालला झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र बचावफळीतल्या खेळाडूंनी सतत चुका करणं सुरुच ठेवल्यामुळे बंगालला फारसे कष्ट करावे लागले नाहीत. अखेरीस बंगालने ३९-३४ च्या फरकाने सामन्यात बाजी मारत प्रो-कबड्डीचं आपलं पहिलं विजेतेपद पटकावलं.