जागतिक स्तरावर अव्वल कामगिरी करण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंकडून हे यश मिळविण्याची संधी गमावली जाण्याचे दु:ख त्यांनी मिळविलेल्या पदकांपेक्षा जास्त असते. ग्लासगो येथे नुकत्याच झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील पी. व्ही. सिंधू व सायना नेहवाल यांच्याबाबत असेच म्हणावे लागेल. सिंधू हिने या स्पर्धेत विजेतेपदाची तर सायना हिने अंतिम फेरीत स्थान मिळविण्याची संधी गमावली. त्याचेच दु:ख जास्त वाटत आहे.

जागतिक स्पर्धेत ऑलिम्पिक विजेती कॅरोलीन मरिन यांच्यासह सर्वच अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा सहभाग होता. साहजिकच तेथे रंगतदार सामन्यांमध्ये अव्वल दर्जाचे कौशल्य पाहण्याची सुवर्णसंधी होती. या स्पर्धेत सिंधू व सायना यांच्यात विजेतेपदाची लढत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. तथापि जपानची युवा खेळाडू नोझोमी ओकुहारा हिने केलेल्या सनसनाटी कामगिरीमुळे ही स्पर्धा वैशिष्टय़पूर्ण ठरली. तिने विजेतेपदाचा मुकुट मिळविताना उपांत्यपूर्व फेरीत कॅरोलीना तर उपांत्य फेरीत सायना हिच्यावर मात केली. एवढेच नव्हे तर तिने ही आश्चर्यजनक विजयाची मालिका अंतिम फेरीत सिंधूवर मात करीतच पूर्ण केली.

सिंधू हिच्या विजेतेपदाच्या मार्गात प्रामुख्याने कॅरोलीना हिचाच मुख्य अडथळा मानला जात होता. तिला ओकुहारा हिने पराभूत केल्यानंतर सिंधूचे पारडे जड मानले गेले. तथापि तिने अंतिम सामन्यात विनाकारण दडपण घेतले असावे. तिची देहबोली त्याचेच प्रतीक होती. पहिला गेम जिंकणे तिच्या हातात होते. या गेममध्ये सुरुवातीला तिने ओकुहारा हिच्या बॅकहॅण्डवर चांगले ड्रॉपशॉट्स टाकले. आघाडी मिळविल्यानंतर ती टिकविणे महत्त्वाचे असते. मात्र सिंधू हिने नकारात्मक गुण देत या गेममधील नियंत्रण गमावले. दुसऱ्या गेममध्ये तिने पुन्हा परतीचे फटके व प्लेसिंगचा बहारदार खेळ केला. ही गेम घेत तिने सामन्यातील आव्हान टिकविले. तथापि तिसऱ्या गेममध्ये निर्णायक क्षणी तिने पुन्हा खराब खेळ केला. स्मॅशिंगच्या फटक्यांवर तिला नियंत्रण ठेवता आले नाही. विजेतेपदासाठी शेवटपर्यंत शंभर टक्के तंदुरुस्ती व संयम आवश्यक असतो. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत जे दिसून आले, त्याचीच पुनरावृत्ती सिंधूकडून जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीत दिसून आली. कमालीचे दडपण व दमछाक यामुळे सिंधू हिला या सामन्यात सतत पाण्याचा ब्रेक घ्यावा लागत होता. तिने घाम पुसण्यासाठी व पाणी पिण्यासाठी एवढा वेळ घेतला की, पंचांकडून तिला पिवळे कार्ड दाखविण्यात आले. खरंतर तिच्याकडून हे अपेक्षित नव्हते. सिंधू हिला अजून भरपूर करिअर करायचे आहे. ऑलिम्पिक व जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीत दिसून आलेला कमकुवतपणा तिने टाळला पाहिजे.

सायना हिला रिओ ऑलिम्पिक स्पर्धेनंतर मोठय़ा शस्त्रक्रियेस सामोरे जावे लागले होते. त्यामुळे अनेक दिवस स्पर्धात्मक सरावापासून ती दूर होती. या पाश्र्वभूमीवर जागतिक स्पर्धेत ती कशी कामगिरी करणार याबाबत उत्सुकता होती. तरीही तिने उपांत्य फेरीत स्थान मिळविल्यानंतर तिच्याकडून विजयाचीच अपेक्षा निर्माण झाली. ओकुहारा हिच्याविरुद्ध पहिला गेम जिंकल्यानंतर तिने हा सामना गमावला व अंतिम फेरीत स्थान मिळविण्याची संधी वाया घालविली. ओकुहारा हिने तिची दमछाक करण्यासाठी केलेले डावपेच यशस्वी ठरले. प्रतिस्पर्धी खेळाडूला सुरुवातीला डोईजड करून घ्यायचे व हळूहळू त्याची दमछाक करीत महत्त्वाच्या क्षणी आपल्या शैलीतील हुकमी अस्त्रांचा उपयोग करीत सामना जिंकायचा हे तंत्र तिने कॅरोलीना, सायना व सिंधू या तीनही खेळाडूंवर वापरले.

आजकाल सामन्यांच्या कार्यक्रम पत्रिका ठरविताना दूरदर्शन वाहिन्यांचा हस्तक्षेप असतो आणि खेळासाठी प्रायोजकांना प्राधान्य देताना या वाहिन्यांनाही टाळता येत नाही. सायना हिचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना रात्री एक दीड वाजेपर्यंत सुरू होता. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी तिला उपांत्य लढत खेळावी लागली. सिंधू हिच्याबाबतही हाच अनुभव दिसून आला. तिची उपांत्य फेरीची लढत रात्री उशिरापर्यंत चालली. लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळीच तिला अंतिम फेरीचा सामना खेळावा लागला. प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी खेळाडूंनी कार्यक्रम पत्रिकांबाबत सवय ठेवली पाहिजे असे मत व्यक्त करताना त्यांचे प्रतिस्पर्धी प्रशिक्षक असलेले विमलकुमार यांना प्रत्यक्षरीत्या टोला हाणण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रम पत्रिकेबाबत वाहिन्यांच्या हस्तक्षेपाचा सायनाच्या खेळावर अनिष्ट परिणाम झाल्याचे मत व्यक्त केले होते. एक मात्र नक्की की वाहिन्यांच्या अतिरिक्त हस्तक्षेपाबाबत आवाज उठविण्याची वेळ आली आहे. त्यांच्या सोयीनुसार सामने झाले व त्याचा अनिष्ट परिणाम एखाद्या खेळाडूचे करिअर धोक्यात आणण्यासाठी होऊ शकतो.

सायनाच्या करिअरबाबत तिचे वाढते वय लक्षात घेता आता मर्यादा दिसून येऊ लागल्या आहेत. सिंधू हिला अजून पुष्कळ यश मिळवायचे आहे. या खेळाडूंबरोबरच आणखी युवा खेळाडूंना जागतिक स्तरावर अव्वल यश कसे मिळेल याची जबाबदारी गोपीचंद व विमलकुमार यांच्यावर आहे.

– मिलिंद ढमढेरे

milind.dhamdhere@expressindia.com