ओडेन्स :विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूला डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतही आपली छाप पाडण्यात अपयश आले. गुरुवारी दुसऱ्याच फेरीत दक्षिण कोरियाच्या अ‍ॅन सी यंगने सरळ गेममध्ये तिचा पराभव केला. त्याचबरोबर बी. साईप्रणीत आणि समीर वर्मा यांच्या पराभवामुळे या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले.

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पाचव्या मानांकित सिंधूला अ‍ॅनकडून १४-२१, १७-२१ असा ४० मिनिटांत पराभव पत्करावा लागला. बॅसेल (स्वित्र्झलड) येथे ऑगस्ट महिन्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पध्रेनंतर सलग तिसऱ्या स्पध्रेत सिंधूला लवकर गाशा गुंडाळावा लागला. २४ वर्षीय सिंधूचा चीन खुल्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीत तर कोरिया खुल्या स्पर्धेत पहिल्या फेरीत पराभव झाला.

साईप्रणीतला दोन वेळा विश्वविजेता ठरलेल्या जपानच्या केंटो मोमोटा याच्याकडून ६-२१, १४-२१ अशी हार पत्करावी लागली. याव्यतिरिक्त समीर वर्माचे पुरुष एकेरीत आव्हान संपुष्टात आले. चीनच्या ऑलिम्पिक विजेत्या चेन लाँगने समीरचा २१-१२, २१-१० असा पराभव केला.

*  मिश्र दुहेरीत, प्रणव चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी यांनाही मलेशियाच्या चौथ्या मानांकित चॅन पेंग सून आणि गोह लिऊ यिंग या जोडीकडून २४-२६, २१-१३, ११-२१ अशी हार पत्करावी लागली.

*  सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला पुरुष दुहेरीत पराभव पत्करावा लागला. चीनच्याच हॅन चेंग काय आणि झोऊ हाओ डाँग जोडीने सात्त्विक-चिराग जोडीला २१-१६, २१-१५ असे हरवले.