तुषार वैती

आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या ४६ वर्षीय कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइड याची अमेरिकेत पोलिसांनी निर्घृण हत्या केल्यानंतर जगभरात वर्णभेदाविषयीची लढाई तीव्र होत चालली आहे. संपूर्ण जग वर्णद्वेषाविरोधात एकवटले आहे. एरव्ही अशा घटनांचे पडसाद मैदानांवर उमटताना फारसे दिसत नाहीत. पण फ्लॉइडच्या मृत्यूनंतर क्रीडाजगतातूनही वर्णद्वेषाविरोधात जोरदार आवाज उमटला. फक्त अमेरिका, युरोपच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातील खेळाडूही वर्णभेदाविरोधात एकवटले. फुटबॉल, बास्केटबॉल (एनबीए), फॉम्र्युला-वन, टेनिस, गोल्फ, अ‍ॅथलेटिक्स इतकेच नव्हे तर क्रिकेट यांसारख्या अनेक खेळांतून वर्णद्वेषाविरोधात आवाज उठवला गेला.

एकीकडे संपूर्ण जग करोनासारख्या भयंकर संकटाचा सामना करत असतानाच क्रीडाविश्व मात्र पूर्णपणे ठप्प झाले आहे. युरोपातील करोनाबाबतची स्थिती सुधारल्यानंतर तेथील क्रीडाविषयक घडामोडींना काहीसा वेग आला आहे. मात्र फ्लॉइडच्या मृत्यूनंतर सध्या जोरदार चर्चा आहे ती वर्णद्वेषाची. सध्या रस्त्यांवर उतरून याबाबत निदर्शने करण्याची वेळ नसल्यामुळे नामांकित क्रीडापटूंनी समाजमाध्यमांद्वारे याबाबत आवाज उठवला आहे. अनेकांनी आपल्याला याआधी वर्णद्वेषी शेरेबाजीला सामोरे जावे लागले होते, असा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे.

‘‘आम्ही कृष्णवर्णीय असलो तरी आमचे कर्तृत्व जगासमोर सिद्ध केले आहे. आमच्या रंगावरून आवाज उठवणाऱ्या आणि कृष्णवर्णीयांचा छळ करणाऱ्यांचा मी निषेध करतो. अन्यायाविरुद्ध शांततेने आवाज उठवून आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आता संघटित होण्याची वेळ आली आहे. राज्यकर्त्यांवर कायद्यात बदल करण्यासाठी संघटितपणे आवाज उठवण्याची वेळ आली आहे,’’ ही सामाजिक मुद्दय़ांवर नेहमीच आवाज उठवणाऱ्या महान बास्केटबॉलपटू मायकेल जॉर्डनची प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे.

‘‘कायदा-सुव्यवस्थेचा आम्ही सन्मान राखतो, पण फ्लॉइडच्या घटनेने सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. या सर्वावर शिक्षणाच्या माध्यमातूनच मार्ग निघू शकतो. संघटित आणि प्रामाणिक संवादातून आपण सुरक्षित आणि एकत्रित समाजाची निर्मिती करू शकतो,’’ अशा शब्दांत अमेरिकेचा विख्यात गोल्फपटू टायगर वुड्सनेही या अन्यायाविरोधात आवाज उठवत एकत्र येण्याचे आवाहन केले.

श्वेतवर्णीयांची मक्तेदारी असलेल्या फॉम्र्युला-वन खेळातील वर्णभेदाविरोधात सहा वेळच्या जगज्जेत्या लुइस हॅमिल्टननेही आवाज उठवला आहे. वर्णद्वेषाविरोधात क्रीडाक्षेत्र पेटून उठले असताना फॉम्र्युला-वन खेळातील कुणालाही याविरोधात आवाज उठवण्याची आवश्यकता भासत नाही, ही शोकांतिका आहे, अशा शब्दांत हॅमिल्टनने उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. इंग्लंड फुटबॉल संघाचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅम यानेही कृष्णवर्णीयांना पाठिंबा दर्शवला असून अनेक फुटबॉल संघटनांनी वर्णद्वेषाविरोधात एकत्र येत आवाज उठवला आहे.

वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू डॅरेन सॅमीने इंडियन प्रीमियर लीगदरम्यान (आयपीएल) आपल्याला सनरायजर्स हैदराबाद संघातील एका भारतीय खेळाडूकडून वर्णद्वेषी शेरेबाजीला सामोरे जावे लागले होते, असा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली. करोनामुळे लांबणीवर गेलेली ‘आयपीएल’ आयोजित करण्याच्या हालचाली सुरू असतानाच सॅमीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला वर्णभेदाच्या मुद्दय़ावर लक्ष घालण्याची विनंती केली आहे. वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने सॅमीला पाठिंबा दर्शवत आपल्याला २० वर्षांच्या कारकीर्दीत जगभर क्रिकेट खेळत असताना वर्णद्वेषाचा सामना करावा लागला होता, असा आरोप करत न्यायाची मागणी केली आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही याविरोधात आवाज उठवत आपले मत व्यक्त केले होते.

‘‘आपण खेळांवर इतके का प्रेम करतो? कारण तो एक सामना नसून त्यापलीकडे बरेच काही आहे. स्वत:चे कर्तृत्व मग ते शारीरिक असो वा मानसिक, ते सिद्ध करण्याची संधी फक्त खेळांमधूनच मिळते. प्रतिस्पर्धी आणि संघसहकाऱ्यांप्रति आदर बाळगण्याची तसेच महत्त्वाचे म्हणजे विविध संस्कृती, धर्म एकत्र आणण्याची संधी ही फक्त खेळांमधूनच मिळते,’’ हे भारताचा फलंदाज लोकेश राहुलचे व्यक्तव्यही वर्णद्वेषाविरोधात खूप काही सांगून जाते.

दोन देशांना एकत्र आणण्याची क्षमता खेळांमध्ये असल्याचे आपण अनेक वेळा पाहिले आहे. पण सध्या श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय अशा दोन गटांमध्ये जग विभागले गेले आहे. म्हणूनच ‘खेळामध्ये जग बदलण्याची ताकद आहे आणि जगाला एकत्र आणण्याची ताकद फक्त खेळांमध्येच आहे,’ हे नेल्सन मंडेला यांचे शब्द आता सत्यात उतरण्याची गरज आहे.

tushar.vaity@expressindia.com