भारताचा माजी कर्णधार आणि युवा संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडची आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाच्या मार्गदर्शकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघाचे माजी साहाय्यक प्रशिक्षक पॅडी अपटन यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे. ‘‘दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या मार्गदर्शकपदी नियुक्ती झाल्याने मी आनंदीत आहे. संघाची महत्त्वाकांक्षा आणि ऊर्जेने मला प्रभावित केले आहे. या संघातील खेळाडूंसोबत काम करायला आवडेल,’’ अशी प्रतिक्रीया द्रविडने दिली.

द्रविड आणि अपटन यांच्यासह झुबीन भारुचा (तांत्रिक संचालक), भारताचे माजी फलंदाज श्रीधर श्रीराम आणि प्रविण आमरे (फलंदाज प्रशिक्षक) आणि भारताचे माजी गोलंदाज टी. ए. शेखर (गोलंदाज प्रशिक्षक) हे दिल्ली संघाला मार्गदर्शन करतील.  आयपीएलच्या गत दोन हंगामात निराशाजनक कामगिरी झाल्यामुळे दिल्लीने मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्या करारात वाढ न करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल २०१४ मध्ये संघाला तळाला राहावे लागले होते, तर गेल्या हंगामात संघ खालून दुसऱ्या क्रमांकावर होता.