News Flash

अनिर्णीत सराव सामन्यात रायुडू, रसूल चमकले

अध्यक्षीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दोनदिवसीय सराव सामना अनिर्णीत सुटला तरी या सामन्यात अंबाती रायुडूने ८७ धावा आणि काश्मीरचा युवा खेळाडू परवेझ रसूल याने अष्टपैलू

| February 14, 2013 03:32 am

अध्यक्षीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दोनदिवसीय सराव सामना अनिर्णीत सुटला तरी या सामन्यात अंबाती रायुडूने ८७ धावा आणि काश्मीरचा युवा खेळाडू परवेझ रसूल याने अष्टपैलू खेळी साकारत चमक दाखवली.
गुरू नानक महाविद्यालयाच्या स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २४१ धावांवर संपुष्टात आणल्यानंतर मॉइसेस हेन्रिक्स आणि नॅथन लिऑन यांच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा डाव २३० धावांवर गडगडला. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या आठ गोलंदाजांनी सराव केला, त्यापैकी हेन्रिक्स आणि लिऑन सर्वात यशस्वी ठरले. हेन्रिक्सने चार, तर लिऑनने तीन बळी मिळवले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने बिनबाद १५ धावा केल्या, पण दोन्ही कर्णधारांच्या संमतीनंतर पंचांनी सामना अनिर्णित राखण्याचा निर्णय घेतला. अध्यक्षीय संघाकडून रायुडूने नऊ चौकार आणि तीन षटकारांसह सर्वाधिक ८७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचे सात विकेट्स टिपणाऱ्या रसूलने ३६ धावांचे उपयुक्त योगदान दिले.
इराणी करंडक स्पर्धेत मुंबईविरुद्ध १५६ धावांची खेळी करणाऱ्या रायुडूने अध्यक्षीय संघाला शानदार सुरुवात करून दिली, पण त्याला अन्य फलंदाजांची साथ लाभली नाही. त्यामुळे अध्यक्षीय संघाची ६ बाद १३२ अशी स्थिती झाली होती. पण त्यानंतर रायुडू आणि रसूल यांनी सातव्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी रचत अध्यक्षीय संघाचा डाव सावरला. अभिनव मुकुंद (२१), रॉबिन उथप्पा (२४) आणि यष्टिरक्षक-फलंदाज पार्थिव पटेल (२३) यांना मोठी खेळी करता आली नाही.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : सर्व बाद २४१.
अध्यक्षीय संघ (पहिला डाव) : ६८.३ षटकांत सर्व बाद २३० (अंबाती रायुडू ८७, परवेझ रसूल ३६; मॉइसेस हेन्रिक्स १२/४, नॅथन लिऑन ६९/४)
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ४ षटकांत बिनबाद १५ धावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 3:32 am

Web Title: raidu rasul shined in unresolved practice match
टॅग : Sports
Next Stories
1 पोलॉर्ड पावला
2 कुस्तीचा समावेश करण्याची आयओसीकडे मागणी
3 कुस्ती वगळण्याचा निर्णय अद्याप अंतिम नाही
Just Now!
X