२०१९ विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत ४ सामने हे पावसामुळे वाया गेले आहेत. यातील ३ सामन्यांमध्ये पावसामुळे एकही चेंडू फेकला गेला नाही, तर एक सामना रद्द करण्यात आला. यामुळे जगभरातील क्रिकेटप्रेमी आयसीसीच्या नियोजनावर टीका करत आहेत. मात्र या पावसाचा फटका, विश्वचषक सामन्यांचं भारतात थेट प्रसारण करणाऱ्या स्टार इंडिया कंपनीलाही बसला आहे. जाणकार व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, ४ सामने रद्द झाल्यामुळे स्टार इंडिया कंपनीला किमान १०० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

अवश्य वाचा – विश्वचषकाचं यजमानपद कसं ठरवलं जातं? काय आहे प्रक्रिया, जाणून घ्या…

रविवारी मँचेस्टरच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्यावरही पावसाचं सावट आहेच, स्थानिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार ६० टक्के रविवारी मँचेस्टरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. “इंग्लंडमधली परिस्थिती आता फारशी चांगली नाहीये, आणि रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला तर जाहीरातदारांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.” जाहीरात क्षेत्रातील एका नामवंत अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

जाहीरात करणाऱ्या कंपनीसाठी ही परिस्थिती मोठी पेचाची आहे. प्रसारणाचे हक्क घेतल्यामुळे त्यांना आयसीसीला पैसे देणं भाग आहे, मात्र सामना पावसामुळे रद्द झाला तर जाहीरातदार कंपनीला पैसे देणार नाहीत. त्यामुळे यामधून होणारा तोटा भरुन काढण्यासाठी विमा हा एक पर्याय उरतो. मात्र विमा कंपनी, सर्व प्रक्रीया केल्याशिवाय पैसे देणार नाही. यासाठी बराच कालावधी जाण्याची शक्यता आहे. तांत्रिक कारणं देऊ विमा कंपन्या किमान ८ ते १० टक्के रक्कम कापूनही देतात. Neo Sports वाहिनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश थवानी यांनी ही माहिती दिली. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध भारत सामन्यात पाऊस पडतो की नाही याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.