बंगाल आणि रेल्वे यांच्यातील यंदाच्या रणजी मोसमातील साखळी सामना चांगलाच गाजला तो अखिलाडूवृत्तीमुळे. रेल्वेच्या खेळाडूंनी अखिलाडूवृत्ती दाखवत बंगालच्या खेळाडूंना खिजवले होते, त्यामुळे सामन्यानंतर बंगालच्या खेळाडूंनी रेल्वेच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. उपांत्यपूर्व सामन्यामध्ये हे दोन्ही संघ पुन्हा भिडणार असून या वेळी रोमांचकारी सामना प्रेक्षकांना पाहता येणार आहे. मुरली कार्तिक हा रेल्वेचा सर्वात अनुभवी खेळाडू असून त्याच्या मैदानावरील रणनीतीवर संघाची भिस्त असेल. बंगालकडेही अशोक दिंडा, लक्ष्मी रतन शुक्ला आणि वृद्धिमान साहासारखे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अनुभव असणारे खेळाडू आहे. हा सामना ईडन गार्डन्सवर होणार असून रेल्वेच्या संघाला बंगालच्या खेळाडूंबरोबरच क्रिकेटवेडय़ा प्रेक्षकांचाही सामना या वेळी करावा लागेल.

कर्नाटकपुढे उत्तर प्रदेशचे आव्हान
बंगळुरू : साखळी सामन्यांमध्ये सलग पाच विजयांनिशी दिमाखदारपणे बाद फेरीत पोहोचलेल्या कर्नाटकच्या संघापुढे आव्हान असेल ते उत्तर प्रदेशचे. भारताचा माजी गोलंदाज वेंकटेश प्रसाद हे उत्तर प्रदेशचे प्रशिक्षक असल्याने हा सामना कर्नाटक वि. प्रसाद, असा रंगण्याची चिन्हे आहेत. दोन्ही संघांमध्ये नावाजलेले खेळाडू असून आतापर्यंतची कामगिरी पाहता कर्नाटकचे पारडे जड दिसत आहे. हा सामना त्यांच्याच मैदानात होणार असल्याने उत्तर प्रदेशसाठी हा उपांत्यपूर्व फेरीचा पेपर अवघड असेल.

पंजाब-जम्मू काश्मीर आमनेसामने
बडोदा : पहिल्यांदाच रणजी स्पर्धेच्या बाद फेरीत पोहोचलेल्या जम्मू आणि काश्मीर संघापुढे पंजाबच्या संघाचे बलाढय़ आव्हान असेल. बाद फेरीत पोहोचल्याने जम्मू आणि काश्मीरचा कर्णधार परवेझ रसूल आणि त्याच्या संघाचे मनोबल उंचावलेले असून त्याचे रूपांतर विजयात होणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पंजाबपुढे काश्मीरचा संघ अनुनभवी वाटत असला तरी त्यांना कमी लेखण्याची चूक करता येणार नाही. त्यामुळे हा सामना चांगलाच रंगण्याची शक्यता आहे.