22 November 2017

News Flash

वसूल!

भारताला भारतात हरवण्याचा इरादा राखून आलेल्या कांगारूंना सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी अवघ्या २४१ धावांत

पीटीआय, चेन्नई | Updated: February 13, 2013 4:58 AM

*  जम्मूच्या परवेझ रसूलचे सात बळी
*  ऑस्ट्रेलिया सर्व बाद २४१
भारताला भारतात हरवण्याचा इरादा राखून आलेल्या कांगारूंना सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी अवघ्या २४१ धावांत तंबूत परतावे लागले. पहिल्या दिवसाचा नायक ठरला तो जम्मू-काश्मीरचा अष्टपैलू खेळाडू परवेझ रसूल. या युवा खेळाडूने अवघ्या ४५ धावांत सात कांगारूंना तंबूचा रस्ता दाखवत वाढदिवसाची ‘भेट’च वसूल केली!
रसूलच्या यशामुळे ऑस्ट्रेलियन संघ चांगल्या दर्जाची फिरकी गोलंदाजी खेळण्यासाठी तयार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. याशिवाय हरभजन सिंग आणि रवीचंद्रन अश्विन यांच्यानंतर फिरकीपटूच्या जागेसाठी निवड समितीला एक पर्याय रसूलने खुला केला आहे.
कारकीर्दीतील सर्वोत्तम प्रदर्शनाची नोंद करणाऱ्या रसूलने संथ खेळपट्टीवर चेंडूला उसळी देऊन ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवले. अर्धशतक करून खेळपट्टीवर स्थिरावलेल्या इडी कोवानला रसूलने पार्थिव पटेलकडे झेल देण्यास भाग पाडले. या सामन्यासाठी कर्णधार असलेल्या मॅथ्यू व्ॉडने सरबजीत लड्डाच्या गोलंदाजीवर षटकार लगावले, मात्र रसूलच्या उसळी दिलेल्या चेंडूने त्याला फसवले. पहिल्या स्पेलमध्ये या दोघांना बाद केल्यानंतर रसूलने दुसऱ्या स्पेलमध्ये स्टीव्हन स्मिथला माघारी धाडले. मोठय़ा खेळीच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या स्मिथला रसूलने बाद केले.
मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी छोटय़ा भागीदाऱ्या करत डाव लांबवला. भारताचा कर्णधार मुकुंदने रसूलकडे चेंडू सोपवला आणि त्याने आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. पीटर सिडल, जेम्स पॅटिन्सन, जॅक्सन बर्ड आणि अ‍ॅश्टन अगरला तंबूत धाडत त्याने ऑस्ट्रेलियाचे शेपूट गुंडाळले.
रसूलव्यतिरिक्त दिल्लीच्या सरबजीत लड्डाने दोन विकेट्स मिळवल्या. मात्र त्यासाठी त्याने ९० धावा दिल्या. आयपीएलच्या नव्या हंगामासाठी तब्बल एक कोटीची बोली लागलेल्या ग्लेन मॅक्सवेलला भोपळाही फोडता आला नाही. स्टुअर्ट बिन्नीने त्याला बाद केले. ऑस्ट्रेलियातर्फे इडी कोवानने सर्वाधिक ५८ धावा केल्या.
भारतीय दौऱ्यात फिरकी गोलंदाजी हे ऑस्ट्रेलियासाठी अवघड समीकरण राहिले आहे. सराव सामन्यात रसूलच्या फिरकीसमोर शरणागती पत्करणारे स्टीव्हन स्मिथ, मॉइझेस हेन्रिक्स आणि ग्लेन मॅक्सवेल हरभजनच्या फिरकीला सामोरे जाऊ शकणार का, याविषयी ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाची चिंता वाढल्या आहेत.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया सर्वबाद २४१ (इडी कोवान ५८, स्टीव्हन स्मिथ ४१, मॅथ्यू व्ॉड ३५, परवेझ रसूल ७/४५, सरबजीत लड्डा २/ ९०) विरुद्ध भारतीय अध्यक्षीय संघ.

First Published on February 13, 2013 4:58 am

Web Title: recover