उदयोन्मुख खेळाडू रितुपर्णा दाससह पी. व्ही. सिंधूने वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली, मात्र गतविजेत्या पारुपल्ली कश्यप आणि सायली गोखले यांना अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. मूळच्या पश्चिम बंगालच्या आणि गोपीचंद अकादमीची विद्यार्थी असलेल्या रितुपर्णाने गतविजेती सायली गोखले आणि मुंबईकर तन्वी लाडला चीतपट करत सनसनाटी विजयाची नोंद केली. पहिल्या लढतीत तिने तन्वीला १५-२१, २१-१२, २१-७ असे नमवले, तर दुसऱ्या सामन्यात सायलीचे आव्हान १३-२१, २१-१३, २१-१४ असे संपुष्टात आणले.
पी. व्ही. सिंधूने पी. सी. तुलसीचा २१-११, २१-१० असा पराभव केला, तर अरुंधती पनतावणेवर २१-१७, २१-१४ अशी मात केली. पुरुष गटात कदंबी श्रीकांतने पारुपल्ली कश्यपला २१-१४, २१-१९ असे नमवत खळबळजनक विजयाची नोंद करत अंतिम फेरीत स्थान पटकावले. त्याआधी श्रीकांतने आनंद पवारवर १८-२१, २१-१४, २१-१३ असा विजय मिळवला होता. आरएमव्ही गुरुसाईदत्तने बी. साईप्रणीथचा २१-१३, २१-१९ असा पराभव केला. गुरुसाईने सौरभ वर्मावर २१-१७, १७-२१, २१-१८ अशी मात केली होती. मिश्र दुहेरीत ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा आणि प्रज्ञा गद्रे-सिक्की रेड्डी यांच्यात अंतिम मुकाबला रंगणार आहे. पुरुष दुहेरीत मनु अत्री-सुमीत रेड्डी जोडीसमोर अक्षय देवलकर-प्रणव चोप्राचे आव्हान असणार आहे.